जुने नाशिक: ईद-ए-मिलादनिमित्त काढण्यात येणाऱ्या जुलूस शांततेत व उत्साहात पार पाडावा. अफवांवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचा आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिला.
भद्रकाली पोलिस ठाण्यात शहर-ए-खतीब हिसामोद्दीन खतीब यांच्या उपस्थितीत या संदर्भात बैठक घेण्यात आली. मार्गदर्शन करताना राऊत म्हणाल्या की, जुलूस मार्गाची पाहणी करून रस्त्याची दुरुस्ती व खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेला पत्र पाठवण्यात आले आहे. जुलूसपूर्वी मार्गाची दुरुस्ती पूर्ण करण्यात येईल.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूक असल्याने शुक्रवारी (ता. ५) रोजी रात्रीतून गणेश विसर्जन मार्गावरील मंडप, सजावट व विद्युत रोषणाई काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जुलूस पुढे सरकल्यानंतर संबंधित भागातील सजावट, मंडप व रोषणाई तातडीने काढण्याचे निर्देशही देण्यात आले, जेणेकरून विसर्जन मिरवणुकीतील चित्ररथांना अडथळा होणार नाही.
कुणास काही अडचण आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन राऊत यांनी यावेळी केले. बैठकीस सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश चौधरी, पोलिस निरीक्षक प्रशांत आहेर, गोपनीय विभागाचे पोलिस हवालदार राजू जाधव, सतीश धनगर, शेखन खतीब, शोएब मेमन, बबलू पठाण, आसिफ मुलानी, इम्रान तांबोळी, सचिन गायकवाड यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशोत्सवात CPR प्रशिक्षणाची जोड; पुण्यातील गृहनिर्माण सोसायटीचा अनोखा उपक्रम, तब्बल 400 हून अधिक रहिवाशांचा सहभागसुरक्षेसाठी सीसीटीव्हींद्वारे नजर
दोन्ही सणांचा बंदोबस्त लक्षात घेऊन चौकाचौकात स्वयंसेवक नेमले जातील. कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, ध्वनिक्षेपणाद्वारे नागरिकांना सूचना दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे सारडा सर्कल ते मौलाबाबा चौक दरम्यानची विद्युत रोषणाई गुरुवार (ता. ४) रोजीच काढून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मंडळांच्या मंडपांचा वाढीव भाग आत घेण्याच्या सूचनाही पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, त्यांनी त्यास सहमती दर्शवली आहे.