मराठा आंदोलनासाठी सिंधुदुर्गाची
पहिली टीम आज रवाना होणार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ः मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही पाठिंबा वाढत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सिंधुदुर्गातून उद्या (ता. २) पहिली टीम मुंबई येथे उपोषण स्थळी रवाना होणार आहे. ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी या टिमचे नेतृत्व करणार आहेत.
मराठा समाज आता आरक्षणाशिवाय माघार घेणार नाही, असा निर्धार धुरी यांनी व्यक्त केला. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला चार दिवस पूर्ण झाले असून, शासनाने कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे समाजात तीव्र असंतोष आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा लढा आता अधिकच उग्ररूप धारण करत आहे. या पार्श्वभूमीवर, आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत हा लढा थांबणार नाही आणि येत्या काळात तो आणखी तीव्र केला जाईल, असा इशारा धुरी यांनी दिला आहे. मराठा समाजाचा संयम आता संपत चालला आहे. शासनाने वेळकाढूपणा केल्यास हे आंदोलन ज्वालामुखीसारखे उसळेल, अशी भावना आंदोलकांमध्ये आहे.