नवयुग गणेशोत्सव मंडळाकडून ‘खाकी’ला सलाम
पोलिस दलाच्या सेवेचा सामाजिक गौरव
जुईनगर, ता. १ (वार्ताहर) ः नेरूळ परिसरातील ३८ वर्षे जुन्या नवयुग उत्सव मित्रमंडळाने समाजप्रबोधनात्मक सजावट केली आहे. ‘खाकी कर्तव्याची कहाणी’ या सदराखाली पोलिसांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. नेरूळ सेक्टर-१० येथील बैठ्या चाळीतील या मंडळाने यंदाही आपल्या आगळ्यावेगळ्या सादरीकरणातून गणेशोत्सवाला सामाजिक भान प्राप्त करून दिले आहे. दरवर्षीप्रमाणे मंडळाने चलचित्राच्या माध्यमातून ‘खाकी कर्तव्याची कहाणी’ या विषयावर अनोखी सजावट साकारली आहे.
नेरूळ सेक्टर-१० येथील बैठ्या चाळीमध्ये साकारलेली ही सजावट चलचित्राच्या माध्यमातून प्रस्तुत करण्यात आली असून, विविध दृश्यांतून पोलिस कर्मचाऱ्यांचे रोजचे आव्हानात्मक जीवन, त्यांच्या जबाबदाऱ्या आणि समाजासाठी भूमिका प्रभावीपणे उलगडली आहे. यामुळे फक्त भक्तिभावच नव्हे, तर समाजप्रबोधनाचाही संदेश मोठ्या प्रमाणावर पसरविण्यात आला आहे. गणेशभक्त आणि नागरिकांनी या आगळ्यावेगळ्या सादरीकरणाला मोठ्या संख्येने भेट दिली आणि मंडळाचे कौतुक केले. दरवर्षीप्रमाणे नवयुग मंडळाने आपल्या सादरीकरणातून सामाजिक जबाबदारीबद्दल जाणीव निर्माण केली आहे. गणेशोत्सव, नवरात्र, ईद, दिवाळी यांसारख्या मोठ्या उत्सवांच्या काळात नागरिकांची गर्दी प्रचंड वाढते. या गर्दीवर नियंत्रण ठेवणे, कायदा-सुव्यवस्था राखणे, महिला सुरक्षा सुनिश्चित करणे आणि गुन्हेगारी घटनांना प्रतिबंध घालणे ही पोलिस दलाची महत्त्वाची जबाबदारी असते. मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर सतत लक्ष ठेवून पोलिस आपले कर्तव्य पार पाडतात. यामुळे नागरिक सुरक्षिततेची जाणीव ठेवून उत्सवाचा आनंद साजरा करू शकतात. नवयुग मित्रमंडळाने या सजावटीद्वारे पोलिस दलाच्या दक्ष आणि समर्पित कार्याचे ऋण व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच नागरिकांमध्ये समाजाभिमुखतेची जाणीव निर्माण करून पोलिस दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम आदर्श मानला जात आहे.