मतपरिवर्तनासाठी स्थानिक नेतेमंडळींचे प्रयत्न
esakal September 02, 2025 03:45 PM

मतपरिवर्तनासाठी नेत्यांचे प्रयत्न
चाकरमान्यांबरोबर बैठका ; मोर्चेबांधणीला सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १ : गणेशोत्सवानिमित्त खेडोपाड्यात उत्साहाचे वातावरण आहे. अशातच जिल्हा परिषद, पंचायत समित्या, पालिका आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीइतकीच चुरस या निवडणुकांत असल्याने गावाकडे आलेल्या मतदारांचे मतपरिवर्तनासाठी स्थानिक नेतेमंडळींचे प्रयत्न सुरू आहेत.
रत्नागिरी जिल्हा परिषद, चिपळूण पंचायत समिती, चिपळूण पालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. आठ महिन्यांपूर्वी काही ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. अशातच लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या माध्यमातून पाचशेहून अधिक लोकप्रतिनिधी निवडले जाणार आहेत. साधारण १ हजारांहून अधिक स्थानिक नेते निवडणुका लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते निवडणुकीच्या कामाला लागल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशातच गणेशोत्सवानिमित्त बाहेरगावी राहणारी मंडळी गावाकडे आलेली आहे. त्यामुळे त्यांच्या भेटीगाठीतून नेतेमंडळी आगामी निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी करीत आहे. गणेशाची आरती झाल्यानंतर बैठका घेतल्या जात आहे.

चौकट
गावबैठकांवर जोर
गणपती दर्शनाचेनिमित्त करून राजकीय नेतेमंडळी गावाकडे आलेल्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. तालुक्यातील अनेक गावांतील विकासाचे निर्णय मुंबईत नोकरी, धंद्यानिमित्त आलेले चाकरमानी घेत असतात. ग्रामस्थ मंडळ, मुंबईकर मंडळ आणि राजकीय पक्षांचे नेते एकत्र येत गावच्या विकासावर चर्चा करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गावाकडे आलेल्या चाकरमान्यांच्या भेटीला नेतेमंडळी येत आहे.

चौकट
इच्छुकांचे शुभेच्छा फलक
चिपळूण पालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक यावर्षी जनतेतून केली जाणार आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी सार्वजनिक गणेशाचे दर्शन घेणे, कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आणि शहरात शुभेच्छा फलक लावून वातावरण निर्मिती सुरू केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.