गणेशोत्सवात CPR प्रशिक्षणाची जोड; पुण्यातील गृहनिर्माण सोसायटीचा अनोखा उपक्रम, तब्बल 400 हून अधिक रहिवाशांचा सहभाग
esakal September 02, 2025 10:45 AM

पुणे : सिंहगड रोडवरील गार्डियन सिटीस्केप्स सोसायटीने यंदा गणेशोत्सव (Pune Ganeshotsav) साजरा करण्यासोबतच आरोग्य जागरूकतेची जोड दिली आहे. सांस्कृतिक समितीच्या पुढाकाराने रविवारी सोसायटीमध्ये सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन) जागरूकता आणि प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जवळपास ४०० हून अधिक रहिवासी, त्यात तरुणांचाही मोठा सहभाग होता.

या सत्राचे नेतृत्व संजीवन हॉस्पिटलमधील इंटेन्सिव्हिस्ट व सोसायटीचेच रहिवासी डॉ. भूषण किन्होलकर यांनी केले. त्यांच्यासोबत आयसीयूमधील डॉक्टरांची टीमही उपस्थित होती. भारतातील केवळ २ टक्के लोकांना सीपीआरची माहिती आहे, तर पाश्चात्य देशांमध्ये हे प्रमाण ४० ते ६० टक्क्यांदरम्यान असल्याचे डॉ. किन्होलकर यांनी नमूद केले. "हृदयविकाराच्या झटक्यावेळी प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. योग्य वेळी सीपीआर केल्यास रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता ४० ते ५० टक्क्यांनी वाढते," असे त्यांनी सांगितले.

'ती' असहाय्यता डोळे उघडणारी होती

दरम्यान, या प्रशिक्षणाला अनेक रहिवाशांसाठी वैयक्तिक महत्त्व होते. आयटी व्यावसायिक चिन्मय आठवले यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात सोसायटीत दोन अचानक हृदयविकाराच्या घटना घडल्या होत्या. "त्या वेळी डॉक्टर सोसायटीत असले तरी रुग्णांच्या कुटुंबीयांना काय करावे हे कळत नव्हते. ती असहाय्यता डोळे उघडणारी होती. अशा प्रसंगात मी पुन्हा निष्क्रिय राहू इच्छित नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.

४० वर्षांखालील लोकांमध्ये हृदयविकाराची समस्या!

भारतामध्ये ४० वर्षांखालील लोकांमध्ये हृदयविकाराच्या घटना वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. बदललेली जीवनशैली, ताणतणाव आणि कामाचा ताण हे घटक त्यामागे असल्याचे मत व्यक्त केले जाते. या उपक्रमाबद्दल सोसायटीच्या सांस्कृतिक समितीचे सदस्य गिरीश मरकळे म्हणाले, "उत्सव समाजाला एकत्र आणतात. आम्हाला ती ऊर्जा अर्थपूर्ण बनवायची होती. गणेशोत्सवाच्या माध्यमातून आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे हा पहिला प्रयत्न असून, पुढील काही महिन्यांत आणखी असे सत्रे आयोजित करण्याची आमची योजना आहे."

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.