मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी जरांगे पाटलांची मागणी आहे. आज या आंदोलनाच्या विरोधात हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी याचिकाकर्त्यांनी आंदोलन नियम मोडत असल्याचे म्हटलं. त्यामुळे कोर्टाने आंदोलकांना नियम पाळण्याची सूचना केली आहे. यानंतर आता मनोज जरांगे पांटलांनी आंदोलकांना नियम न मोडण्याची विनंती केली आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
आपल्याला न्यायालयाच्या आदेशाचे पालन करायचे आहे – जरांगे पाटीलमनोज जरांगे पाटील म्हणाले की, ‘आपल्याला न्यायालयाच्या आदेशाचे पालन करायचे आहे. आपल्याला शेजारी एक मैदान मोकळं करुन दिलं आहे. तिथे गाड्या लावा आणि मैदानावर झोपा. तुम्हाला आरक्षण पाहिजे नसेल तर तुम्ही गावाकडे जाऊ शकता. मला किती त्रास होत आहे हे तुम्हाला माहिती नाही. तुमच्या लेकराबाळांसाठी मी कष्ट सहन करत आहे. आरक्षण देऊन लेकरांच्या पिढ्यांचा उद्धार करायचा आहे. मला माझी जात मोठी करायची आहे.
तुम्ही शांत रहा एवढंच माझं म्हणणं आहेपुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मला त्रास होत आहे. मला तुमच्यासोबत बोलण्यासाठी पाणी प्यावे लागत आहे. माझी तुम्हाला शेवटची विनंती आहे, मुंबईकरांना त्रास देऊ नका. तुमच्यामुळे माझी जात हरू नये, माझी तुम्हाला शेवटची विनंती आहे. सर्वांनी मैदानात गाड्या लावा आणि झोपा, गावाकडून लोक जेवण पाठवत आहेत, त्यांना आपली काळजी आहे. आपल्याला न्यायालयाच्या नियमाचे पालन करायचे आहे. तुम्ही शांत रहा एवढंच माझं म्हणणं आहे, ज्याला ऐकायचं नाही त्यांनी गावाकडे जा असंही जरांगे पाटलांनी म्हटले आहे.
ओबीसी समाजाकडून आंदोलनाची घोषणाआज छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी छगन भुजबळांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. छगन भुजबळांनी म्हटलं की, ‘ते लोक काय करणार याबाबत आम्हाला काहीही कर्तव्य नाही. आपण आता तयारीला लागा, अनेक ठिकाणी उपोषणे सुरु करायची आहेत. तहसीलदारापासून कलेक्टरपर्यंत सगळीकडे मोर्चे काढा. त्यांना आमच्या ओबीसीच्या वाट्यामध्ये दुसरे वाटेकरी नकोत ही मागणी करा असा आदेश भुजबळांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.