ढिंग टांग : बिहार यात्रा स्पेशल..!
esakal September 03, 2025 01:45 AM
ढिंग टांग

बेटा : (थकलेल्या सुरात ) ढॅ-ण-ट-ढॅ-ण…मम्मा एकदाचा आयॅम बॅक!

मम्मामॅडम : (पक्षीय कामकाजात नेहमीप्रमाणे व्यग्र…) हं! गुड!!

बेटा : (हातातली प्रवासी बॅग टाकत) दमलोय की!

मम्मामॅडम : (कागदपत्रे हातावेगळी करत) हं हं!

बेटा : (सदऱ्याची वरची बटणे सोडवत) प्रवासाचा शीण आलाय!

मम्मामॅडम : (कामात प्रचंड बिझी…) हं हं हं!!

बेटा : (वैतागून पाय हापटत) कमॉन, मी इतका थकून आलोय, पण माझ्याकडे बघायलासुद्धा वेळ नाही का?

मम्मामॅडम : असं रे काय करतोस! कामात होते जरा! कुठून येतो आहेस? काय हा अवतार? आंघोळीला जा बरं आधी!!

बेटा : (खुर्चीत आरामशीर बसत) हुश्श! पंख्याखाली बरं वाटतं! नाहीतर गाडीच्या टपावर बसून बसून पाय आंबले होते…

मम्मामॅडम : (काळजीच्या सुरात) ओह गॉड! गाडीच्या टपावर बसून प्रवास करु नये असं कितीदा सांगितलं तुला! ऐकत का नाहीस? कुठे गेला होतास?

बेटा : (अभिमानाने) बिहार में बहार लाने के लिये गये थे हम! मम्मा, लिहून ठेव, यावेळी बिहारचं इलेक्शन आपण जिंकणार!! कमळवाल्यांची मतचोरी उघड होणार! माझी व्होटर अधिकार यात्रा सुफळ संपूर्ण झाली, मम्मा!!

मम्मामॅडम : (मायेच्या सुरात) कशाला रे करतोस एवढी दगदग! आजवर इतक्या यात्रा केल्यास, काय फायदा झाला? तुझ्या व्होटर अधिकार यात्रेचा आपल्याला खरंच फायदा होणार आहे का काही?

बेटा : (आत्मविश्वासाने) अफकोर्स! मी व्होटर अधिकार यात्रेमध्ये तेराशे किलोमीटर पालथे घातले, आणि ११० मतदारसंघ कव्हर केले!! आपला प्रचार ऑलमोस्ट पूर्ण झालाय!! पुन्हा बिहारमध्ये नाही गेलं तरी चालेल! ते केरळचे स्टालिन तर म्हणाले की आमच्याकडेही या की एकदा! आपणही तिथं ‘व्होटरम अधिकारम यात्रा’ काढू!! मला खूप राज्यांमधून बोलावणी येताहेत!! बघू, जाईनसुध्दा!!

मम्मामॅडम : (त्राग्यानं) त्या स्टालिननंच मागल्या खेपेला बिहारी लोक स्वच्छतागृहं साफ करणारे असतात, असं म्हटलं होतं ना? त्यांना कशाला यात्रेत सामील करुन घेतलंस?

बेटा : (उदारपणे) हमारी मुहब्बत की दुकान है! हम किसी को ना नहीं कहते!! यावेळी माझी यात्रा यशस्वी होऊन आपले तेजस्वीभय्या खुर्चीत बसणार म्हणजे बसणारच!

मम्मामॅडम : (हादरुन जात) म्हंजे? एवढी यात्रा कशासाठी केलीस? शेवटी सत्तेवर दुसराच कुणीतरी बसणार? धिस इज राँग!!

बेटा : (औदार्यपूर्ण आविर्भावात) दुनियादारी इसी को कहते है, मम्मा! मेहनत कोई और करता है, और फकीर अंडा खाता है...!

मम्मामॅडम : (नाराजीने) ते काही नाही! आपण व्होटर यात्रा काढली आहे, सत्तेवर आपलाच माणूस बसला पाहिजे!! तेजस्वीभय्या नको, किंवा आणखी कोणीही नको!! मग आपल्याला या यात्रेचा काय फायदा?

बेटा : (धोरणीपणाने) खूप फायदे आहेत! यात्रेनंतर आपल्याला जागावाटपात जास्त डिमांड करता येतील!! मी मुद्दाम कमळवाल्यांच्या बिहारी बालेकिल्ल्यातच यात्रा काढली! तिथली सगळी मतं आपल्याला मिळाली की निम्मं काम फत्ते होणार!

मम्मामॅडम : (गोंधळून) ते ठीक, पण त्यामुळे काय होईल!

बेटा : (खांदे उडवत) दुसरं काय होणार? नितीशबाबू घरी जाणार! कमळवाले कायमचे गाशा गुंडाळणार! तेजस्वीभय्या खुर्चीत बसणार!! बिहारमध्ये मी किंगमेकर ठरणार!!

मम्मामॅडम : (कमरेवर हात ठेवून) आणि मग आपल्या पक्षानं काय करायचं?

बेटा : (उत्साहानं) मी पुढल्या यात्रेच्या तयारीला लागलोसुद्धा! डोण्ट वरी!! चलो, नो व्हिसा, नो हिडन कॉस्ट!!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.