समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावला
रायगड जिल्ह्यात भातपिकावर किडीचा प्रादुर्भाव कमी
अलिबाग, ता. १ : रायगड जिल्ह्यात ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली आहे. जमिनीवरील भातपिकांना लावणीनंतर १५ ते २० दिवसांचा सलग पावसाचा खंड पडल्याने भातपिके संकटात आली होती. आता श्रावणातील तीन-चार दिवस पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आत्ता भातपिकांवरील किडीरोगाचा प्रादूर्भाव कमी होण्याला मदत होणार असल्याची आशा येथील शेतकरी व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, बळीराजाच्या मेहनतीवर येणारे संकट टळणार असल्याने बळीराजा सुखावला आहे. भातपिकाला अद्याप लोंब धरण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. भाताची वाढ जोमाने व्हावी म्हणून खताचा मारा करण्यासाठी पावसाचे प्रमाण कमी असणे आवश्यक आहे.
-------------------------
खत देण्यास योग्य
सध्या पावसाचे प्रमाण खत देण्यास योग्य असून, भाताची वाढ चांगल्या प्रकारे होत आहे. १५ दिवसांपूर्वी आलेल्या मुसळधार पावसानेही जिल्ह्यातील भातशेतीचे फारसे नुकसान झालेले नव्हते. यामुळे पडणाऱ्या पावसाबद्दल येथील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.
-----------------------------
पिकाला पूरक पाऊस
मागील १५ दिवसांनंतर आत्ता भातशेतीच्या पिकाला पूरक असा पाऊस होत आहे. यंदा शेतीच्या मशागतीचा फायदा बळीराजाला होणार असल्याचे चित्र भातशेतीच्या पिकावरून दिसत आहे.