अंबासन: गावात एका डुक्कर मालकाने वीसहून अधिक कुत्र्यांना विष देऊन ठार केल्याप्रकरणी तालुक्यात संतापाची लाट आहे. सामाजिक माध्यमांवरूनही मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त केला जात आहे. सदर डुक्कर मालकावर जायखेडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले होते त्यानंतर उशिराने दोघांची सुटका केली.
गावात डुक्करांच्या उपद्रवाबाबत अनेक वेळा शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही डुक्कर मालकांकडून कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. डुक्कर शेतात शिरून डाळिंब व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. त्याविरोधात आता गावात उद्रेक वाढला आहे.
वीसहून अधिक निष्पाप कुत्रे व मांजरी मृत्युमुखी पडल्याने परिसरात संतप्त वातावरण होते. प्राणीप्रेमींनी सोशल मीडियावरून या घटनेचा तीव्र निषेध केला. प्राणी फाऊंडेशन, भारतीय प्राणी कल्याण मंडळाकडेही तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर दबाव वाढत आहे. घटनेनंतर जायखेडा पोलिसांनी गांभीर्याने लक्ष घालून त्वरीत संशयित सुरेश शामराव शिंदे व त्याचा मुलगा अंबादास सुरेश शिंदे यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सात दिवसांत डुकरांची विल्हेवाट लावा
गावात तणावपूर्ण शांतता आहे. ग्रामपंचायतीने सर्व डुक्कर मालकांना स्पष्ट शब्दांत सांगितले आहे, की सात दिवसांत डुकरांची विल्हेवाट लावा, अन्यथा पोलिस प्रशासनाच्या मदतीने कठोर पावले उचलली जातील.
या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. डुकरांबाबत ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी लक्षात घेता पुढील कार्यवाहीसाठी नियोजन करण्यात येत आहे.
- संदीप चेडे, उपनिरीक्षक जायखेडा.
Crime News : पालघरमध्ये ३२ लाखांच्या खैर लाकडांची तस्करी उघड, दोन आरोपींना अटकग्रामसभेत अनेकदा या समस्येकडे लक्ष वेधले गेले होते. आता मात्र संयमाला सीमारेषा असून डुक्करमुक्ती ही अपरिहार्य आहे.
- राजसबाई गरुड, सरपंच, अंबासन.
दोन लाखांहून अधिक नुकसान आमच्या डाळिंब बागेचे झाले आहे. आम्ही गावाजवळील शेतकऱ्यांनी अनेकवेळा डुक्कर मालकांना सांगितले, पण त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरेच मिळतात.
- जगदीश कोर, डाळिंब उत्पादक शेतकरी