छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' च्या प्रेक्षकांना काही दिवसांपूर्वी मोठा धक्का बसला. ज्योती चांदेकर म्हणजेच प्रेक्षकांच्या लाडक्या पुर्णा आजी यांचं निधन झालं. १६ ऑगस्ट रोजी ज्योती यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ६९ वर्षांच्या होत्या. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्या काही दिवसांसाठी पुण्याला गेल्या होत्या, मात्र तिथेच त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यानंतर उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांचं निधन झालं. आता मालिकेत पुर्णा आजीची जागा कोण घेणार याबद्दल निरनिराळ्या चर्चा आहेत. मात्र त्यावर जुई गडकरीने प्रेक्षकांना माहिती दिली आहे.
'ठरलं तर मग' या मालिकेने गेले अडीच वर्ष प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. त्यात पुर्णा आजी सगळ्यांच्या लाडक्या होत्या. त्यांची भूमिका ही अतिशय वेगळी होती. मात्र ज्योती यांच्या निधनानंतर ही भूमिका कोण साकारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. नेटकऱ्यांनी तर पुर्णा आजी म्हणून दुसऱ्या कोणत्या अभिनेत्रीला आणू नका असं सांगितलं. मात्र यावर अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. अशातच मालिकेची नायिका सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी हिने इंस्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग हे सेशन घेतलं. त्यावरही जुईला अनेकांनी याबद्दल प्रश्न विचारले. त्यावर जुईने उत्तर दिलंय.
jui gadkari
आस्क मी एनिथिंगमध्ये जुईला नेटकऱ्याने विचारलं 'पूर्णा आजीच्या भूमिकेसाठी कोणाची एन्ट्री होणार आणि कधी होणार?' त्यावर जुई म्हणाली, “मला याबद्दल अनेक लोक प्रश्न विचारत आहेत. आम्ही सगळेच तिला मिस करत आहोत. पण, आता तिच्या भूमिकेसाठी नवीन कोण येणार वगैरे…हे सगळं आम्हाला सुद्धा माहिती नाहीये. या सगळ्या गोष्टींबाबत चॅनेल निर्णय घेणार आहे. हे निर्णय चॅनेलचे असतात. त्यामुळे चॅनेलने याबाबत अधिकृत माहिती दिल्याशिवाय कोणीही युट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबूकवर येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये.”
यापूर्वी मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनीही याबद्दल अजून कोणताही निर्णय झाला नसल्याचं सांगितलं होतं. तर दुसरीकडे ‘ठरलं तर मग’च्या सेटवरचा प्रत्येकजण सध्या पूर्णा आजीला मिस करत आहे. त्यामुळेच मालिकेचे ९०० भाग पूर्ण झाल्यावर या टीमने सेटवर आजीच्या नावाने सदाफुलीचं रोपटं लावल्याचं पाहायला मिळालं होतं.
'संगीत देवबाभळी' फेम शुभांगी सदावर्ते पती आनंद ओकपासून विभक्त; सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती