Duleep Trophy 2025 : ऋतुराज गायकवाडचे शतक; आशिया चषक स्पर्धेतून वगळलेल्या Shreyas Iyerला अपयश, उडाला त्रिफळा
esakal September 05, 2025 08:45 AM
  • आशिया चषक संघातून वगळल्यानंतर श्रेयस अय्यरवर दुलीप ट्रॉफीत स्वतःला सिद्ध करण्याचा दबाव होता.

  • आर्य देसाई व ऋतुराज गायकवाड यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी केली.

  • ऋतुराज गायकवाडने शतक झळकावत पश्चिम विभागाचा डाव सावरला.

Shreyas Iyer performance in Duleep Trophy 2025 semi-final : आशिया चषक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघातून श्रेयस अय्यरला वगळल्यानंतर बराच गोंधळ झाला. आयपीएल, रणजी करंडक, देशांतर्गत स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करूनही श्रेयसला स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले. पण, त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळेल अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळेच दुलीप ट्रॉफीत त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण, त्यांच्या वाट्याला निराशा आली. मात्र, ऋतुराज गायकवाडने ( RUTURAJ GAIKWAD HITS CENTURY) किल्ला लढवला आणि शतक झळकावले.

यशस्वी जैस्वाल ( ४) व एच देसाई ( १) हे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्यानंतर आर्य देसाई व ऋतुराज गायकवाड यांनी पश्चिम विभागाचा डाव सावरला. शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वाखाली पश्चिम विभाग हा सामना खेळतोय आणि यात अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू असल्याने सर्वांची उत्सुकता लागली आहे. आर्य व ऋतुराजची भागीदारी ८० धावांवर संपुष्टात आली.

Duleep Trophy 2025: यशस्वी जैस्वालने निराश केले, ऋतुराज गायकवाडने दमदार अर्धशतक झळकावले; सावरला संघाचा डाव

आर्य ८४ चेंडूंत ६ चौकारांसह ३९ धावांवर हर्ष दुबेच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. ऋतुराजने एका बाजू सांभाळताना ७२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. श्रेयस अय्यरसोबत त्याने चौथ्या विकेटसाठी ५६ चेंडूंत ४५ धावा जोडल्या.

ही जोडी तोडण्यासठी मध्य विभागाने अनुभवी गोलंदाज खलिल अहमदला आणले आणि हा निर्णय योग्य ठरला. खलिलने ३६व्या षटकात अय्यरचा त्रिफळा उडवला. त्याला २८ चेंडूंत २५ धावांवर माघारी जावे लागले. पश्चिम विभागाला १३७ धावांवर चौथा धक्का बसला.

ऋतुराजने १३२ चेंडूंत १३ चौकारांसह शतक पूर्ण केले आणि पश्चिम विभागाला ५ बाद २०५ धावांपर्यंत घेऊन गेला. शाम्स मुलानी १८ धावा करून माघारी परतला.

दुखापतीमुळे ऋतुराजला आयपीएल २०२५ मधून मध्येच माघार घ्यावी लागली होती आणि त्यानंतर भारत अ संघाकडून त्याला संधी मिळाली नाही. बुची बाबू ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना त्याने शतक झळकावले होते आणि आजही शतकी खेळी केली. आतातरी त्याला कसोटी संघात स्थान मिळेल अशी अपेक्षा आहे.

BREAKING : शिखर धवनला ED ची नोटीस, मनी लाँड्रिंग प्रकरणात होणार चौकशी; नेमकं प्रकरण काय?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.