संग्रामपूर - सद्यस्थितीत सातपुडा पर्वतामधील तिन जिल्ह्याच्या सीमा रेषेवर असलेले वारी हनुमान धरण 90 टक्के भरले आहे. या धरणात मध्य प्रदेश मधून पाण्याची आवक पाहता धरणाच्या दोन दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
या पाण्यामुळे तालुक्यातील रिंगणवाडी गट ग्रामपंचायत हद्दीतील मोमिनाबाद गावाकडे जाण्या-येण्यासाठी असलेल्या वान नदीवरील पुलावरून सध्या पाणी वाहत असल्याने गावकऱ्यांचे हाल होत आहेत.
रिंगणवाडी आणि मोमिनाबाद या दोन गावांच्यामध्ये वान नदीवर पूल तयार केलेला असून त्याची उंची मुळातच कमी आहे. त्यातच अलीकडे नदीपात्रात उभारलेल्या नवीन बंधाऱ्यामुळे पाण्याची पातळी वाढली असून, गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पुलावरून पाणी वाहते आहे. यामुळे मोमिनाबाद गावाचा वरवट बकाल या मुख्य बाजारपेठेशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे.
गावकऱ्यांच्या सोयीसाठी पूल उभारण्यात आला होता. बंधारा नव्हता तोवर सर्वकाही व्यवस्थित सुरु होते. मात्र, जलसंधारणाच्या अनुषंगाने नदीवर बंधारा तयार केला. या बंधाऱ्याचे लाभही मिळत आहेत. परंतु दुसरीकडे पुलाची उंची कमी असल्याने व बंधाऱ्यातील पाणी पातळी अधिक राहत असल्याने वारंवार गावाचा संपर्क तुटतो.
अशा स्थितीत गावातील आजारी रुग्णांना वरवट (बकाल) येथे उपचारासाठी नेण्याकरिता खांद्यावर घेत पाण्याच्या प्रवाहातून जीव मुठीत धरून पुल ओलांडावा लागतो. त्यामुळे रुग्णसेवेत मोठे अडथळे निर्माण झाले आहेत.
केळी जागेवरच पिकू लागली -
मोमिनाबाद हे गाव केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र सध्या झालेल्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हजारो रुपये खर्च करून वर्षभर शेतात मेहनत घेत तयार केलेले केळीचे पीक काढणीच्या टप्प्यावर असतानाच शेतात पिकू लागले आहे. वाहतूक ठप्प झाल्याने बाजारपेठेत उत्पादन पोहोचवता येत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
उंची वाढवण्याची गरज -
याबाबत स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार वान नदीवरील विद्यमान पुलाची उंची अपुरी आहे. बंधाऱ्यामुळे पाण्याची पातळी वाढून हा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. त्यामुळे तातडीने नवा उंच पूल बांधण्याची गरज आहे.
लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतीने या प्रश्नात लक्ष घालून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नवीन पुलासाठी तातडीने मागणी करण्याची मागणी होत आहे. वेळप्रसंगी आंदोलन छेडण्यासाठी तयार असल्याचे गावकरी सांगत आहेत.