जुनी सांगवी, ता.९ : पिंपळे निलख परिसरातील रक्षक चौक ते पिंपळे निलख गावादरम्यान मुख्य रस्ता, उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम पूर्ण होण्यास नागरिकांना अजून चार ते पाच महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यातच पावसाने पर्यायी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. याच रस्त्यावरुन पिंपळे निलखकरांना धोकादायकरीत्या रहदारी करावी लागत असल्याने पर्यायी रस्त्यांची किमान डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मागील अनेक वर्षांपासून रक्षक चौक येथे उड्डाणपुलाची गरज व्यक्त केली जात होती. त्यामुळे संरक्षण विभागाच्या हद्दीतील मुख्य उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाच्या कामाला फेब्रुवारी २०२३ मध्ये सुरुवात झाली. पुलाची लांबी अंदाजे दीडशे मीटर आणि रुंदी अठरा मीटर आहे. हे काम ऑगस्ट २०२५ मध्ये पूर्ण होणार होते. मात्र, ते संथगतीने चालू असल्याने नागरिकांना सुखकर रहदारीसाठी अजून चार ते पाच महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे तूर्तास पर्यायी रस्ता व पिंपळे निलख गावा अंतर्गत खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती कामे तातडीने करावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
याचबरोबर पिंपळे निलखच्या क्रांतीनगर ते डीपी रस्ता हा मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी गटारे खचून त्यांची झाकणे वर आली आहेत. मुख्य रस्ता वळणावर मधोमध खड्डे पडल्याने नागरिकांना धोकादायकरीत्या रहदारी करावी लागत आहे.
प्रचंड कोंडीला तोंड
पिंपळे निलख गावातील नागरिकांना रक्षक चौकाजवळ प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. उड्डाणपुलाचे काम सुरू असताना वाहतुकीसाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. तरीही नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यामुळे पर्यायी रस्त्याची दुरवस्था होऊन खड्डे, पाणी साचून अपघातांचा धोका वाढला आहे. पर्यायी काही महिन्यांपूर्वी याच परिसरात एका चाकरमानी दुचाकीस्वाराचा अपघातात झाला होता. काम होईल तेव्हा होईल, मात्र पर्यायी रस्ता आणि अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे दुरुस्ती केले जावेत, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून भुयारी मार्ग, उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने पिंपळे निलख व इतर नागरिकांना पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागत आहे. परंतु हा रस्ता खड्डेमय व छोटा असल्याने नागरिकांना येथून रहदारीसाठी कसरत करावी लागत आहे.
- अनिकेत लांघे, रहिवासी, विशालनगर
खाली मजबूत आधार नसल्याने पर्यायी रस्ता खचून खड्डेमय झाला आहे. प्रशासनाकडून वारंवार खडी मुरूम टाकून मलमपट्टी केली जात आहे. मात्र, त्याचा उपयोग होत नाही. पावसाळ्याचे दिवस असल्याने पावसाने पुन्हा खड्डे उघडे पडतात.
- माणिक भांडे, नागरिक
पर्यायी रस्त्याची वारंवार दुरुस्ती कामे करण्यात आली आहेत. येथील डागडुजीची कामे करण्यात येतील. उड्डाणपुलाचे काम गतीने सुरू असून एका स्लॅबचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या चार महिन्यांत येथील काम पूर्ण होईल. काम पूर्ण झाल्यावर रहदारी सुकर होण्यास मदत होईल. आतल्या बाजूने काम सुरू असल्याने नागरिकांना काम सुरू आहे अथवा नाही हे असल्याचे समजत नाही. लवकरच दोन्ही बाजूंनी माती भराव करून उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल.
- सुनील शिंदे, उपअभियंता ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय
PIM25B20344, PIM25B20345