श्रीगोंदे: रस्ते कामाचा गुणवत्ता निरीक्षण अहवाल मिळवून देण्यासाठी ७ हजारांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या येथील बांधकाम उपविभागाचे सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता प्रकाश पाचनकर याच्याविरुद्ध श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदाराने जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकामविभागाअंतर्गत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाची दोन कामे घेतलेली आहेत. या कामांचे बिल काढण्यासाठी आरोपी पाचनकर याने गुणवत्ता निरीक्षकाकडून गुणवत्ता अहवाल मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे दोन कामांचे प्रत्येकी साडेतीन हजार, अशी सात हजार रुपयांची मागणी केली. याबाबत १६ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी केली असता, आरोपी कनिष्ठ अभियंता प्रकाश पाचनकर याने सात हजारांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या फिर्यादीवरून आरोपी प्रकाश पाचनकर याच्याविरुद्ध श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.