Nagar-Sambhajinagar Road: नगर-संभाजीनगर रस्ता दिल्ली दरबारी; खासदार वाकचौरेंनी ठोठावले मंत्री नितीन गडकरींचे दार, 'सकाळ'ने उठवला आवाज
esakal September 10, 2025 09:45 PM

-विनायक दरंदले

सोनई : अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर रस्त्याच्या दुरवस्थेवर प्रकाशझोत टाकणाऱ्या दैनिक सकाळमध्ये प्रकाशित ''खड्ड्यात गेला रस्ता'' मालिकेतील सात भागांचे कात्रण केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आले. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे व सोनई येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी जीवघेण्या रस्त्याचा प्रश्न दिल्लीच्या दरबारात मांडल्याबद्दल ग्रामस्थ, व्यावसायिक व प्रवाशांकडून स्वागत होत आहे.

Honesty Employee :'साईंच्या दरबारातील टोकाचा विरोधाभास'; कंत्राटी कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचे सर्वच स्तरातून कौतुक

महामार्गावर पडलेले हजारो खड्डे व त्यामुळे दररोज होणाऱ्या अपघातानंतर ग्रामस्थ, उद्योजक, शालेय विद्यार्थी, लहान-मोठे व्यावसायिक व प्रवाशांच्या वाढत्या तक्रारीनंतर दैनिक सकाळमध्ये १ सप्टेंबरपासून सुरू केलेल्या ''खड्ड्यात गेला रस्ता'' मालिकेतील वाहतूक कोंडी, अपघात, दुभाजक, साईड गटार व सूचना फलकाविषयी वास्तव मांडण्यात आले आहे. यामुळे जनजागृती झाल्याने विविध सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जागतिक बँक प्रकल्पाकडे निवेदन देण्यास सुरुवात केली आहे.

दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर-मनमाड व नगर-छत्रपती संभाजीनगर व इतर रस्त्यांबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या होत्या. काल सोमवार (ता. ८) रोजी खासदार वाकचौरे यांनी ‘सकाळ‘मध्ये प्रकाशित सर्व बातम्यांची कात्रण एकत्रित करून बरोबर रस्ता कामाचे पत्र आज (मंगळवारी) नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सादर केले. राष्ट्रीय मराठी मोर्चाचे अध्यक्ष आनंद रेखी व उद्योजक अतुल बोकरीया (जैन) यांनी दोन्ही महामार्ग व राहुरी- शनिशिंगणापूर राष्ट्रीय महामार्ग नंबर १६१ विषयी निर्माण झालेली स्थिती सांगितली.

यावेळी सोनई येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शेटे व कपिल क्षीरसागर उपस्थित होते. मंत्री गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करून उपाययोजनांबाबत आदेश दिला. मागील वर्षी डांबराने खड्डे बुजविण्यासाठी टेंडर दिलेल्या ठेकेदारावर कारवाईचे आदेश देऊन रस्त्याच्या कामांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. बोकरीया व शेटे यांनी नगर दक्षिणचे खासदार नीलेश लंके यांची नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेऊन रस्त्याचा प्रश्न मांडला.

महामार्गावरील प्रवास जीवघेणा झाला आहे. हा प्रश्न दैनिक सकाळने मांडला आहे. आज त्यातील कात्रणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आले. याबाबत पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावला जाईल.

- भाऊसाहेब वाकचौरे, खासदार, शिर्डी लोकसभा मतदारसंघ.

खड्ड्यांच्या प्रश्नासाठी गुरुवारी (ता.१८) जागतिकबँक प्रकल्प कार्यालयास टाळे ठोको व धरणे आंदोलन करणार आहे. अधिकारी व ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा.

-संभाजी माळवदे, अध्यक्ष काँग्रेस पक्ष, कामगार विभाग

आनंदाची बातमी! 'गायीच्या दूध दरात तीन रुपयांपर्यंत वाढ'; सातारा जिल्ह्यात सुमारे ५५ हजार दूध उत्पादकांना दिलासा

अहिल्यानगर ते वडाळा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांचा जीव गेला, खड्डे व वाहतूक कोंडीत प्रवासात दिरंगाई होत असल्याने या प्रश्नावर न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे.

- प्रकाश शेटे, सामाजिक कार्यकर्ते, सोनई.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.