कोपरी वॉटर फ्रंटचे वास्तव उघड
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत उभारलेल्या कोपरी खाडीलगतच्या कोपरी वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाचा फज्जा उडाला आहे. अवघ्या अडीच वर्षांतच कोट्यवधींचा प्रकल्प मोडकळीस आला असून निकृष्ट दर्जा व भ्रष्टाचार स्पष्टपणे समोर आला आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता राहुल पिंगळे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशी व कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन दिले आहे.
कोपरी येथील वॉटर फ्रंट प्रकल्पात शौचालय, अॅम्पी थिएटर, उद्यान, वाहनतळ, जेट्टी रस्ता नूतनीकरण, ऐतिहासिक तोफांसाठी चौथरा, दशक्रियेसाठी घाट अशा सुविधा करण्यात आल्या होत्या. आज या सर्वच सुविधा दुरावस्थेत दिसत असून नागरिकांच्या पैशांची उघड उधळपट्टी झाल्याचे चित्र आहे. अॅम्पी थिएटरला तडे, बाकड्यांची मोडतोड, तोफांचा चौथरा उखडलेला दिसत आहे. निकृष्ट कामे, भ्रष्टाचार व ढिलाई यामुळे प्रकल्पाची दुर्दशा झाली आहे. काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून, जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.