मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅझेटिअरची अंमलबजावणी करण्याची मागणी आंदोलन करत सरकारकडे केली. या आमरण उपोषणावर तोडगा काढण्यासाठी सरकारने सरकारने हैदराबाद गॅझेटिअरची अंमलबजावणी करण्यासाठी मान्यता दिली. तसेच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी देखील मान्य केली आहे. या मागणीमुळे ओबीसींचे असलेले आरक्षण संपुष्टात येईल या भीतीमुळे लातूरमधील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. या शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक पत्र लिहिले. ते पत्र वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.
सुसाईड नोटमध्ये काय?
भरत कराड यांनी मृत्यूपूर्वी एक पत्र चिठ्ठी लिहिली आहे. यामध्ये त्यांनी, मी भरत महादेव कराडे आताच महाराष्ट्र सरकारने समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे ओबीसींचे कायमस्वरुपी आरक्षण संपवले आहे. मी वेळोवेळी ओबीसी बचाव आंदोलनात सहभाग घेतला होता. तरीही सरकारने ओबीसी समाजाचा घात करुन ओबीसी विरोधी जीआर काढल्यामुळे मी जीवन कायमस्वरुपी संपवत आहे. माझ्या पाठीमागे तरी माझ्या कुटुंबाला आणि ओबीसी समाजाला न्याय मिळावा असे म्हटले आहे. भरत कराड हे फार शिकलेले नव्हते. त्यांनी मुलांच्या वहितील कागद फाडून त्यावर पेनाने लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीने अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.
वाचा: मुंबई हादरली! जेवणाच्या वादाचा हादरवणारा शेवट, 5 मित्रांनी असा कांड रचला की त्याला आयुष्यातून उठवलं
भरत कराड हे 35 वर्षांचे होते. ते लातूर जिल्हातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावात रहात होते. गेल्या कित्येक वर्षांपासून ते शेती करत होते. पण सरकारने मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास सुरुवात केल्यानंतर ते चिंतेत होते. त्यांना त्यांच्या मुलांच्या भविष्याची काळजी वाटू लागली होती. भविष्यात आपल्या मुलांना आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही या कल्पनेनेच ते निराश झाले होते. शेवटची त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.
छगन भूजबळांनी घेतली भेट
भरत कराड यांनी स्वत:चे जीवन संपवल्यानंतर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळा आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, आई-वडील असा मोठा परिवार आहे. तसेच त्यांना तीन भाऊ देखील आहेत. ओबीसी आरक्षणाचे प्रमुख नेते छगन भुजबळ यांनी लातूरला जाऊन भरत कराड यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच कुटुंबीयांचे सांत्वन देखील केले.