ब्राझिलिया : ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने देशाचे माजी अध्यक्ष जेर बोल्सोनारो यांना गुरुवारी २७ वर्षे तीन महिन्यांची शिक्षा ठोठावली. २०२२ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही पदावर टिकून राहण्यासाठी कट रचून सत्तापलटाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात त्यांना दोषी ठरवण्यात आले. आपल्यावरील गैरकृत्याचे आरोप नेहमीच फेटाळणाऱ्या बोल्सोनारो सध्या ब्राझिलियातच नजरकैदेत असून ते या निर्णयाविरुद्ध अपील करू शकतात.
न्यायालयाच्या पाचसदस्यीय खंडपीठापैकी चार न्यायाधीशांनी बोल्सोनारो यांना पाच गुन्ह्यांमध्ये दोषी ठरविले. या निर्णयामुळे ब्राझीलमधील राजकीय दरी आणखी रुंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सत्तापालटाचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरलेले बोल्सोनारो हे ब्राझीलचे पहिले माजी अध्यक्ष आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही त्यांना तत्काळ तुरुंगात जावे लागणार नाही. खंडपीठ पुढील ६० दिवसांत निकाल प्रकाशित करेल.
हा निर्णय प्रकाशित झाल्यानंतर बोल्सोनारो यांच्या वकिलांना स्पष्टीकरणासाठी काही दिवस मुदत मिळेल. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश क्रेमेन लुसिया यांनी सांगितले की, यासंदर्भात ॲटर्नी जनरल कार्यालयाने सादर केलेले पुरावे ठोस असून ब्राझीलचे माजी अध्यक्ष जाइर बोल्सोनारो हे सत्तेत राहण्यासाठी किंवा ती पुन्हा मिळविण्यासाठीच्या प्रत्येक हालचालीचे प्रमुख सूत्रधार होते. सत्ता पुन्हा हस्तगत करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणाऱ्या गटाचे नेते होते.
बोल्सोनारो यांचे मोठे चिरंजीव व सिनेटर फ्लिव्हिओ बोल्सोनारो यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आपल्या वडिलांना ठोठावलेली शिक्षा ही सर्वोच्च पातळीवरील छळमोहीम आहे. आम्ही योग्य बाजूवर उभे होतो, हे इतिहासातून स्पष्ट होईल.
बोल्सोनारो यांच्या खटल्यावरून ब्राझीलमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. उजव्या नेत्याचा राजकीय छळ होत असल्याचा दावा करणाऱ्यांनी रस्त्यावर उतरून त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्राझीलवरील आयातशुल्कात ५० टक्क्यांनी वाढ केल्यानंतर या खटल्याकडे नव्याने लक्ष वेधले गेले होते. या खटल्यानंतर अमेरिका ब्राझीलवर नवीन निर्बंध जारी करू शकते. त्यामुळे दोन्ही देशांमधील नाजूक राजनैतिक संबंध आणखी ताणले जाऊ शकतात.
Nepal Incident News Updates: नेपाळमध्ये ठाण्याचे १२२ पर्यटक अडकले.! व्हिडीओ कॉल बघा | Sakal News अमेरिकेची नाराजीब्राझीलचे माजी अध्यक्ष बोल्सोनारो यांना २७ वर्षांची शिक्षा ठोठावण्याच्या या निर्णयाबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली असून बोल्सोनारो हे एक उत्तम नेते असल्याचे नेहमीच जाणवले, ते दोषी ठरणे, ब्राझीलसाठी अतिशय वाईट आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘व्हाईट हाऊस’मधून बाहेर पडताना दिली.