आपले आरोग्य चांगले राहावे, यासाठी आपण अनेकदा आहार, फिटनेस आणि व्यायामावर लक्ष केंद्रीत करतो. पण आरोग्याचा एक महत्त्वाचा पैलू अनेकदा दुर्लक्षित करतो आणि तो म्हणजे शौचालयाचा वापर. आपण दैनंदिन जीवनात भारतीय की पाश्चात्य शौचालय वापरतो. पण उत्तम आरोग्यासाठी कोणते शौचालय अधिक योग्य आहे, याबद्दल आपण जाणून घेऊया.
काही आरोग्य तज्ज्ञांच्या मते, भारतीय शौचालयाचा वापर केल्याने बसण्याची मुद्रा आणि पचन सुधारते. तर पाश्चात्य शौचालय हे वृद्घांसाठी अधिक सोयीचा आणि आरामदायी असल्याचे म्हटले जाते.
भारतीय शौचालय वापरताना व्यक्तीला पूर्णपणे खाली बसून मलविसर्जन करावे लागते. या मुद्रेमुळे आतड्यांवर नैसर्गिकरित्या योग्य तो दबाव येतो, ज्यामुळे कोलन (colon) पूर्णपणे रिकामे होण्यास मदत होते. हे नैसर्गिक आसन असल्याने तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच बद्धकोष्ठता तसेच मूळव्याध यांसारख्या समस्यांचा धोका कमी होतो.
याउलट, पाश्चात्य शौचालयात बसून मलविसर्जन करताना शरीर ९० अंशांच्या कोनात असते, ज्यामुळे आतड्यांवर नैसर्गिकरित्या कोणताही दबाव येत नाही. त्यामुळे, कोलन पूर्णपणे रिकामा होण्यास अडथळा येतो. यामुळे अनेकदा पचनक्रिया मंदावते. तसेच बद्धकोष्ठतेसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
पाश्चात्य शौचालयांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांचा वापर करणे खूप सोपे आणि आरामदायी आहे. लहान मुले, वृद्ध व्यक्ती यांच्यासाठी ते फार सोयीचे असते. तसेच ज्यांना गुडघे दुखीचा त्रास आहे किंवा शारीरिक अपंगत्व आलेले आहे, त्यांच्यासाठी हे शौचालय अधिक सोयीचे असते. आजारातून बरे होत असलेल्या व्यक्तींसाठी पाश्चात्य शौचालयाचा वापर करणे तुलनेने सोपे असते.
तर दुसरीकडे, भारतीय शौचालयांचा वापर करणे अशा लोकांसाठी खूप कठीण असू शकते. कारण त्यांना खाली बसण्यासाठी आणि उठण्यासाठी गुडघे आणि पायांवर जास्त जोर द्यावा लागतो.
भारतीय शौचालयांमध्ये त्वचेचा थेट पृष्ठभागाशी संपर्क येत नाही. ज्यामुळे संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका कमी असतो. तसेच त्यांची नियमित स्वच्छता करण्यासाठी तुलनेने अधिक पाणी आणि वेळ लागू शकतो.
पाश्चात्य शौचालयांमध्ये सीटचा थेट संपर्क त्वचेशी येतो, ज्यामुळे बॅक्टेरिया पसरण्याचा धोका वाढतो. त्यामुळे या शौचालयांची स्वच्छता नियमितपणे करणे अत्यंत आवश्यक असते. जर स्वच्छता राखली नाही तर यामुळे त्वचेच्या आणि इतर संसर्गांचा धोका वाढू शकतो.
भारतीय शौचालये पाश्चात्य शौचालयाच्या तुलनेत कमी जागा व्यापतात. त्यांची किंमत देखील कमी असते. त्यामुळे कमी बजेट असलेल्या घरांमध्ये किंवा ग्रामीण भागात त्यांना अधिक पसंती दिली जाते.
तर दुसरीकडे पाश्चात्य शौचालयांना जास्त जागा लागते. ती खूप महाग असतात. शहरांमध्ये आधुनिक जीवनशैली आणि सोयीसुविधांना प्राधान्य दिले जात असल्यामुळे त्यांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो.
भारतीय आणि पाश्चात्य या दोन्ही शौचालयांचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. जर तुम्ही तरुण आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी असाल, तर पचन आणि आतड्यांच्या चांगल्या कार्यासाठी भारतीय शौचालय अधिक फायदेशीर ठरू शकते. मात्र घरातील वृद्धांसाठी किंवा शारीरिक अपंग आलेले व्यक्ती असतील तर पाश्चात्य शौचालय हा एक चांगला पर्याय आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)