शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वेधले प्रशासनाचे लक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वेधले प्रशासनाचे लक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वेधले प्रशासनाचे लक्ष
esakal September 18, 2025 11:45 AM

भाताणे गावातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वेधले प्रशासनाचे लक्ष
विरार, ता. १७ (बातमीदार) : भाताणे हे महसूल गाव असून, यामधून भाताणे व नवसई अशी दोन नवीन गावे विभागली गेली आहेत. नवसई गावाचा नवीन आकारबंध प्राप्त झालेला असला तरी भाताणे गावाचा आकारबंध अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे जुन्या व नवीन सर्व्हे नंबरचा ताळमेळ लागत नसल्यामुळे शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याकडे माजी आमदार राजेश पाटील यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे.
महाभूमी अभिलेख प्रणालीमध्ये नकाशे नवीन सर्व्हे नंबरप्रमाणे अद्ययावत झाले असले तरी ७/१२मध्ये त्याची नोंद न झाल्यामुळे शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी अद्ययावत होत नाही. जीपीएसद्वारे सर्व्हे नंबरचे स्थान वेगळ्या ठिकाणी दिसून आल्याने पिकांची योग्य नोंद करणे अशक्य बनले आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा, शासकीय योजना व भातविक्री करताना गंभीर अडचणी निर्माण होऊ शकतात. यासंदर्भात माजी आमदार राजेश रघुनाथ पाटील यांनी उपअधीक्षक, भूमी अभिलेख वसई तसेच तहसीलदार, वसई यांना पत्राद्वारे विनंती करून मौजे भाताणे गावाचा नवीन आकारबंध तत्काळ प्राप्त करून महाभूमी प्रणाली व ७/१२मध्ये आवश्यक दुरुस्ती करून ई-पीक पाहणी अद्ययावत करण्याची मागणी केली आहे. यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळेल व त्यांच्या हक्काच्या शासकीय योजना व लाभ मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.