थांबा
esakal September 18, 2025 11:45 AM

फेरीवाले-रिक्षांचा विळखा, पीएमपी थांबा ओळखा
किंवा
प्रवाशांचा व्हावा खोळंबा, हा तर आपलाच थांबा
वाहतूक पोलिस, महापालिकेच्या कारवाईबाबत कूटप्रश्न
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १६ ः पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) अनेक बस थांबे अनधिकृत फेरीवाले आणि रिक्षाचालकांनी वेढले आहेत. ‘प्रवाशांचा व्हावा खोळंबा, हा तर आपलाच थांबा’ हेच त्यांचे घोषवाक्य असावे अशी स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी त्यांच्यावर वाहतूक पोलिस, महापालिका प्रशासनाचा अतिक्रमण विरोधी विभाग केव्हा कारवाई करणार, असा कूटप्रश्न प्रवाशांना पडला आहे.
पीएमपीच्या बस निर्धारित थांब्याच्या समोर उभे करणे चालकांना कुठेही शक्य होत नाही. त्यामुळे पीएमपीच्या प्रवाशांमध्ये जास्त संख्या असलेले ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची प्रचंड गैरसोय होते.
पीएमपीच्या सुमारे दोन हजार बस आहेत. सर्व थांबे पीएमपीने प्रवाशांच्या सोईसाठी बनविले आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत पीएमपीएमएलचे नऊ हजारांपेक्षा जास्त थांबे आहेत. उन्हाळ्यात व पावसाळ्यात त्रास होऊ नये म्हणून अनेक थांब्यांवर शेडही टाकण्यात आले आहे. थांब्यापासून ५० मीटरपर्यंत इतर खासगी वाहन लावण्यास किंवा थांबविण्यास कायद्याने मनाई आहे. तरीही नियम धाब्यावर बसवत रिक्षा, खासगी वाहने बिनदिक्कतपणे उभी केली जातात. फेरीवाल्यांसाठी तर हे थांबे म्हणजे जणू काही हक्काचे ठिकाण झाले आहे. त्यामुळे काही थांबे तर दिसत नाहीत अशी स्थिती आहे.
प्रवाशांना धोका, वाहतुकीत अडथळा
रिक्षा आणि फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना थांब्यासमोर सुरक्षित ठिकाणी उभे राहण्यासाठी जागाच उरत नाही. थांब्याच्या बाजूला उभे राहावे लागल्यामुळे त्यांना धोका निर्माण होतो. यामुळे बसमध्ये चढणे आणि उतरणे सुद्धा कठीण होते. थांब्यापाशी रिक्षा उभ्या असल्याने चालकांना बस रस्त्याच्या मध्येच उभी करावी लागते. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो. याचा परिणाम वाहतूक कोंडी वाढण्यात होतो. अनेकदा प्रवाशांना रस्त्याच्या मध्येच उतरावे लागत असल्याने मागून येणाऱ्या वाहनाची धडक बसण्याचा धोकाही निर्माण होतो.
---
पीएमपीएमएलचे पथक कागदावरच
पीएमपीएमएल माजी अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी पीएमपी बस थांब्यापाशी उभ्या राहणाऱ्या रिक्षांवर कडक कारवाईसाठी पथक तयार केले होते. यात वाहतूक विभागाचा एक अधिकारी व दोन कर्मचारी होते. वाहतूक पोलिस आणि आरटीओच्या मोटार वाहन निरिक्षकांच्या साथीत कारवाई केली जाणार होती. ही घोषणा होऊन दोन वर्षे उलटत आली तरी कारवाई झालेली नाही. रिक्षाचालक थांब्यावरूनच प्रवासी भरत असल्याचे ठिकठिकाणी दिसते. त्यामुळे कागदावरील हे पथक केव्हा सक्रिय होणार असाही प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
-------------
निगडीतील भोसरी बस थांब्यावर सकाळी खूपच गर्दी होते. त्याच वेळी तेथे रिक्षा लावलेल्या जातात. त्यामुळे भोसरीकडे आणि अन्य ठिकाणी जाणाऱ्या बसना थांब्यापाशी येऊच शकत नाहीत. अनेकदा बस रस्त्यात तिरक्या उभ्या केल्या जातात. या रस्त्याची रुंदीही कमी असल्यामुळे टिळक चौकातून येणाऱ्या वाहनांची कोंडी होते. बसमध्ये बसनाही त्रास होतो. बसचालकांना सांगूनही रिक्षावाले जागचे हलत नाहीत. काही वेळा तर रिक्षा लावून चालक कुठेतरी गेलेले असतात. एखादा गंभीर अपघात होण्याआधी वाहतूक पोलिसांनी कायमस्वरूपी उपाय काढावा.
- शिवराम वैद्य, प्रवासी
-------------
बस स्थानकांवरील अनधिकृत विक्रेते आणि रिक्षा हटविण्यासाठी पथक नेमण्यात येणार आहे. वाहतूक पोलिस, आरटीओ आणि पीएमपीएमएलचे कर्मचारी यांच्याकडून संयुक्त दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
- पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल
-------

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.