India Pakistan 2nd Clash Date Time : आशिया कप 2025 मध्ये बुधवारी, 17 सप्टेंबर रोजी UAE ला 41 धावांनी हरवून पाकिस्तानने टॉप 2 मध्ये एंट्री घेतली आहे. या संघाने सुपर-4 मध्ये प्रवेश केला आहे. सध्या या गटात भारत अव्वल आहे. लवकर भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा सामना रंगणार आहे. यापूर्वी 14 सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला लोळवले होते. हा पराभव पाक संघाच्या जिव्हारी लागला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर या सामन्यावर बहिष्काराचे सावट दिसून आले. भारतीय संघाने सामना जिंकल्यानंतर पाक संघाच्या खेळाडूंशी हस्तांदोलन टाळले.
केव्हा रंगणार भारत-पाक सामना?
आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ गट अ मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोन्ही संघात आता 21 सप्टेंबर रोजी, रविवारी दुबईतील आंतरराष्ट्रीय मैदानावर सामना होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार, रात्री 8 वाजता सुरू होईल. गेल्या रविवारी भारताने आबुधाबीमध्ये पाकिस्तान संघाचा 7 गडी राखून मोठा पराभव केला होता. पाकिस्तान संघ सर्व बाद मोठी धावसंख्या उभारण्यात सपशेल अपयशी ठरला होता.
या ठिकाणी पाहा सामना
भारत आणि पाक संघातील ही धूमशान 21 सप्टेंबर रोजी होईल. दुबईतील आंतरराष्ट्रीय मैदानावर पुन्हा दोन्ही देश भिडतील. हा सामना प्रेक्षक सोनी स्पोर्ट्स नेटवर्क, सोनी लिव्ह ॲपवर पाहू शकता अथवा टीव्ही 9 मराठी साईटवर अपडेट मिळवू शकता. या सामन्यावरही विरोधक आणि क्रिकेट प्रेमी बहिष्कार टाकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारताचे पारडे जड
या सामन्यात भारतीय टीम पुन्हा विजय नोंदवण्यासाठी आसूसली आहे. तर सलमान अली आगा याच्या नेतृत्वात पाकिस्तान संघ 14 सप्टेंबर रोजी झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची तयारी करत आहे. रेकॉर्ड पाहता आतापर्यंत T20I मध्ये भारत आणि पाकिस्तान संघात 14 सामने झाले आहेत. यामध्ये भारताचे पारडे जड आहे. त्यात टीम इंडियाने 11 सामने खिशात घातले आहेत. तर पाकिस्तानला केवळ 3 सामने जिंकता आले आहे. गेल्या 5 सामन्यात तर भारताने पाक संघाला पायदळी तुडवले आहे. गट अ संघात भारत, पाकिस्तान या तगड्या संघासह युएई आणि ओमान हे संघ सुद्धा आहेत. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारत पाकड्यांना लोळवण्यासाठी पुन्हा सज्ज झाला आहे.