ठाणे कोपरीची कोंडी नोव्हेंबर अखेर सुटणार
esakal September 18, 2025 09:45 PM

कोपरीची कोंडी नोव्हेंबरअखेर सुटणार
प्रकल्पाचे काम ८० टक्के पूर्ण, ठाणे पालिकेने आखले कामाचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : ठाणे पूर्व भागातील वाहतूक कोंडी फोडण्याबरोबरच रेल्वे प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीची सेवा मिळावी यासाठी सॅटिस-२ प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पात रेल्वे प्रशासनाकडून मिळणाऱ्या परवानगीचे मोठे अडथळे होते. हे अडथळे पार करीत, या प्रकल्पातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून, स्थानक परिसरातील डेकचे काम सुरू आहे. ही कामे नोव्हेंबरअखेरपर्यंत पूर्ण करून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे पश्चिम रेल्वेस्थानक परिसरातील कोंडी कमी करण्यासाठी सॅटिस प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून, त्याच धर्तीवर स्मार्ट सिटी योजनेतून ठाणे पूर्व रेल्वेस्थानक परिसरात सॅटिस -२ प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. २६० कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. डिसेंबर २०२२ मध्ये प्रकल्पाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. तांत्रिक कारणांमुळे या प्रकल्पाला उशीर होत असल्याचे दिसून आले. यामध्ये प्रकल्पाचा आराखडा बदल आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या यामुळे हा प्रकल्पाच्या कामास विलंब झाला. या जागेवरील रेल्वे विभागाची बांधकामे, शौचालये तसेच इतर अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत बराच कालावधी लागला. यामुळे स्थानकाच्या पूर्वेला डेक उभारणीचे काम रखडले होते. गेल्या काही महिन्यांपासून हे काम वेगाने सुरू आहे. तसेच या प्रकल्पातील रेल्वे रुळांवरील पूलजोडणीचे काम शिल्लक होते. रेल्वेच्या ओव्हरहेड वायरच्या खांबाची उंची साधारणतः चार फूट कमी करण्यात आली असून, या कामासाठी पालिकेने रेल्वे विभागाकडे काही महिन्यांपूर्वी एक कोटी ९० लाख रुपये जमा केले होते. हे काम रेल्वे विभागाने नुकतेच पूर्ण केले आहे. आता पुढच्या टप्प्यात पूल जोडणीचे काम हाती घेत, ठाणे पूर्व सॅटिस प्रकल्पातील रेल्वे मार्गिकेवरील पूल जोडणीसाठी पाच गर्डर टाकण्यात आले आहेत.
दरम्यान, रेल्वे विभागाकडून गेल्या वर्षभरात परवानगी मिळताच या प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. सहा ओव्हरहेड वायरचे खांब स्थलांतरण करण्याबरोबरच रेल्वे रुळावरील पुलाच्या जोडणीचे कामही नुकतेच पुर्ण झाले आहे. या पुलावरील मार्गिकेची उर्वरित अंतिम टप्प्यातील कामे सुरू आहेत. ही कामे ऑक्टोबर अखेर पूर्ण करण्याचे नियोजन पालिकेने आखले आहे. तसेच स्थानक परिसरात डेक उभारून त्याला पूल जोडण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित २० टक्के कामे पूर्ण करून हा पूल वर्षाअखेरीस खुला करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोट
ठाणे पूर्व सॅटिस प्रकल्पातील पुला जोडणीचे काम पूर्ण झाले असून, यावरील रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. ही कामे ऑक्टोबरअखेर, तर पुलाला जोडणाऱ्या डेकचे काम पूर्ण करून हा पूल वर्षाअखेरीस म्हणजेच, डिसेंबरपर्यंत खुला करण्याचे नियोजन आखण्यात आलेले आहे.
- संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त, ठामपा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.