'पंचायतराज अभियान ग्रामीण विकासासाठी महत्त्वाकांक्षी'
esakal September 18, 2025 09:45 PM

उरुळी कांचन, ता. १७ : ‘‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासासाठी आखलेले महत्त्वाकांक्षी पाऊल आहे. अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने आपली भूमिका प्रभावीपणे बजावत ग्रामविकासाच्या कामात सर्व ग्रामस्थांना सहभागी करून घ्यावे व ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावाच्या प्रगतीसाठी संकल्पबद्ध होऊन हे अभियान यशस्वी करावे. हे अभियान आपला सर्वांचा सामूहिक संकल्प आहे. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे या अभियानात पुणे जिल्हा राज्यात आदर्श ठरेल,’’ असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा जिल्हास्तरीय प्रांरभ ग्रामपंचायत सोरतापवाडी (ता. हवेली) येथे बुधवारी (ता. १७) उत्साहात संपन्न झाला. यावेळी पाटील बोलत होते. या अभियानाचे उद्घाटन पुणे विभाग आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी, अतिरिक्त आयुक्त दीपाली देशपांडे, सहाय्यक आयुक्त रवींद्र कणसे, गटविकास अधिकारी शेखर शेलार, ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड, सरपंच मनिषा चौधरी, उपसरपंच विलास चौधरी, सदस्य स्नेहल चौधरी, सुनीता चौधरी, विजय चौधरी, सुदर्शन चौधरी, रंगनाथ चोरघे, शशिकांत चौधरी आदी उपस्थित होते.
दरम्यान, ग्रामस्थ, विद्यार्थी व महिला यांच्या सहभागातून प्रभात फेरी काढण्यात आली. तसेच, अभियानाचा संदेश जनमानसात पोचविण्यासाठी आकर्षक चित्ररथाचे आयोजन केले होते. शंकर कड यांनी सूत्रसंचालन केले. उपसरपंच विलास चौधरी यांनी प्रास्ताविक केले. अभियानाची माहिती प्रशिक्षक जालिंदर काकडे यांनी दिली. रामदास चौधरी यांनी आभार मानले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.