नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मंजूर
९८० शेतकऱ्यांना ५५.६५ हेक्टर क्षेत्रासाठी निधी मंजूर
महाड, ता. १७ (बातमीदार) ः २०२५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यासह कोकणातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाई निधी जाहीर केला असून यामुळे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे; मात्र शेतकरी अल्पभूधारक असल्याने भरपाईच्या दरात वाढ करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.
जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यात सुमारे ६६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. राज्य सरकारने कोकणासह आठ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली असून एकूण एक हजार ८७५ शेतकऱ्यांना ३७ लाख ४० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी रायगड जिल्ह्यातील ९८० शेतकऱ्यांना ५५.६५ हेक्टर क्षेत्रासाठी ११ लाख ८१ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार असून बँकांनी ही रक्कम कर्ज खात्यात वळवू नये, असे स्पष्ट निर्देश दिले गेले आहेत. मंजूर दरांमध्ये कोरडवाहू शेतीसाठी ८, ५०० रुपये प्रति हेक्टर, जिरायती शेतीसाठी १३, ६०० रुपये प्रति हेक्टर आणि बागायती शेतीसाठी १७, ५०० रुपये प्रति हेक्टर इतकी भरपाई निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी भरपाई अपुरी असल्याचे सांगत दरवाढीची मागणी केली आहे. पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान, शेतजमिनीवर गाळ साचणे किंवा जमीन वाहून जाणे अशा अनेक घटना घडल्या असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कळित झाले आहे.
................
पेरणी न झालेल्या शेतकऱ्यांवर अन्याय
या वर्षी अनेक शेतकरी वेळेवर पेरणी करू शकले नाहीत. अशा पडीक जमिनींचा पंचनामा न झाल्याने हे शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार आहेत. शासनाने पडीक व पेरणी न झालेल्या क्षेत्राचाही विचार करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कोकणातील भातशेती प्रामुख्याने गुंठ्यांमध्ये होत असल्याने मिळणारी भरपाई अत्यल्प असल्याची खंत शेतकऱ्यांची आहे. भात हे कोकणातील एकमेव पीक असून पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांपुढे उपजीविकेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे पेरणी न झालेल्या क्षेत्रांनाही नुकसानभरपाईचा लाभ देणे अत्यावश्यक आहे, असे सुनील जाधव या शेतकऱ्याने सांगितले.