पिंपरी, ता. १९ ः शहरातील हवा शुद्ध करण्यासाठी उभारण्यात आलेली यंत्रणा दुरवस्थेमुळे बेशुद्ध पडल्याचे चित्र चौकाचौकांत दिसत आहे. एअर प्युरिफिकेशन फाउंटन सिस्टीम असे नाव असलेल्या या यंत्रणेचे लोखंडी गज गंजून एकतर तुटत किंवा लटकत असल्याचे दिसते. हे गज वाहनचालक किंवा पादचाऱ्यांच्या अंगावर पडून त्यांची शुद्ध हरपण्याचा धोका टाळण्यासाठी महापालिकेने ही यंत्रणाच बंद ठेवली आहे. या यंत्रणेची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत (NCAP) राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या धर्तीवर शहरातील दूषित हवा शुद्ध करण्यासाठी १७ प्रमुख चौकांमध्ये हवेतील प्रदूषण रोखणारी यंत्रणा उभारण्याची संकल्पना राबविली. तुषार हवेत उडून प्रदूषण कमी करण्याचा यामागील उद्देश आहे. आकर्षक रचना असलेली ही यंत्रणा दुरवस्थेमुळे शोभेची वस्तूही ठरत नसल्याचे विदारक चित्र दिसत आहेत.
सध्या आकुर्डी खंडोबा माळ चौक, चिंचवड, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पिंपरी), नाशिक फाटा चौक, कस्पटेवस्ती, होळकर चौक, वाकड-कोकणे चौक, तळवडे चौक आदी ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. यातील बहुतांश ठिकाणी लोखंडी गज तुटण्याच्या स्थितीत आहेत. नागरिकांच्या आरोग्याचा धोका कमी करण्यासाठी अशा ठिकाणी तांत्रिक तपासणी करून तत्काळ दुरुस्ती करावी आणि यंत्रणा सुरक्षित करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
---
आकुर्डी खंडोबा माळ चौकातील हवा शुद्ध करण्यासाठी बसविण्यात आलेली यंत्रणा नादुरुस्त झाली आहे. त्यातील एक गज तुटला असून कधीही खाली पडून दुखापत होऊ शकते. तरी महानगरपालिकेने दुरुस्तीकडे लक्ष द्यावे.
-चंद्रशेखर डुंबरे, आकुर्डी
---
हवा शुद्ध करणाऱ्या यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी. ही यंत्रणा सक्षम व नियमित कार्यान्वित करावी. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा विषय अतिशय गंभीर असल्याने त्वरित कार्यवाही करावी. वेळेत दुरुस्त झाली नाही तर अपघात होऊ शकतो.
- दीपक खैरनार, निगडी
--
हवा शुद्ध करणाऱ्या यंत्रणेची रचनाच तशी आहे. सगळे पाइप फायबरचे आहेत. त्यामुळे ते तुटण्याचा प्रश्न येत नाही. तरी ज्या चौकात तुटलेले आहेत, त्याची दुरुस्ती करण्यात येईल.
- संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता महापालिका
----------