जिओने टेलिकॉम सेक्टरमध्ये क्रांती घडवून आणली. जिओने सुरुवातीला ग्राहकांना फुकटात अनलिमिटेड कॉलिंग, इंटरनेट आणि एसएमएसची सुविधा दिली. जिओने टेलिकॉम सेक्टरमध्ये हात पाय पसरवण्यासाठी आणि प्रस्थापितांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी ही योजना राबवली. फुकटात इंटरनेट आणि कॉलिंग सुविधा मिळत असल्याने लोकांचाही जिओकडे ओढा वाढला. ठराविक आठवडे फुकटात सर्वकाही दिल्यानंतर जिओने कॉलिंग, डेटा आणि एसएमएसाठी कमी दरात निश्चित कालावधीसाठी प्लान आणला. त्यामुळे स्पर्धेत कायम राहण्यासाठी इतर स्पर्धकांनाही जिओप्रमाणे सारखाच प्लान आणावा लागला. मात्र या प्लानचा फटका ग्राहकांनाच बसला.
आधी खात्यातील रक्कम संपल्यानंतर आऊटगोइंग कॉल करताच येत नव्हते. मात्र नव्या रिचार्जनुसार व्हॅलिडीटी संपेपर्यंत हवं तितकं बोलण्याची सुविधा मिळाली. मात्र या नवीन प्लाननुसार, रिचार्ज संपल्यानंतरच्या ठराविक दिवसानंतर इनकमिंग कॉल बंद केले जातात. त्यामुळे ग्राहकांना नाईलाजाने नंबर सुरु ठेवण्यासाठी ऑल ईन वन रिचार्ज करणं बंधनकारक झालंय. फिचर फोन असलेल्यांनाही नाहक ऑल ईन वन रिचार्ज (इंटरनेट, कॉलिंग आणि एसएमएस) करावा लागतो. परिणामी ग्राहकांचे अतिरिक्त पैसे वाया जातात. त्यावर ग्राहकांनीही शक्कल लढवली. ग्राहकांनी 2 सिम कार्ड वापरण्याची सुरुवात केली. एक प्रमुख सिम आणि दुसरा कामचलाऊ.
मात्र अनेक टेलिकॉम कंपन्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात रिचार्जच्या दरात वाढ केली. त्यामुळे 2 सिम कार्ड वापरणाऱ्यांना खर्च परवडेनासा झाला. त्यामुळे ग्राहकांनी प्रमुख मोबाईल नंबर असलेला सिम कार्ड रिचार्ज करणं सुरु ठेवलं. तर दुसरा नंबर तसाच सोडून दिला. अनेक जण पैसे वाचवण्यासाठी महिनोंमहिने नंबर रिचार्ज न करताच सोडून देतात. मात्र ही चूक तुम्हाला चांगलीच महागात पडू शकते.
कोणत्याही सिम कार्डची ठराविक व्हॅलिडीटी असते. व्हॅलिडीटी असेपर्यंत सिम रिचार्जशिवायही एक्टीव्ह राहतो. मात्र तुम्ही अनेक महिने रिचार्ज केला नाहीत तर नंबर बंद केला जाऊ शकतो. धक्कादायक बाब म्हणजे तो नंबर दुसऱ्या ग्राहकाला वितरित केला जाऊ शकतो. याचाच अनुभव काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा क्रिकेटर आणि आरसीबीला पहिलीवहिली आयपीएल ट्रॉफी जिंकून देणारा कॅप्टन रजत पाटीदार याला आला.
अनेक दिवस मोबाईल नंबर रिचार्ज न केल्याने तुमच्या प्रायव्हसीला धोका पोहचू शकतो. रिचार्ज न केल्याने तुमची सेवा बंद करुन तोच नंबर दुसऱ्या ग्राहकाला दिला जाऊ शकतो. त्यामुळे तुमच्या नावावर नोंद असलेल्या नंबरवर येणारे कॉल्स, ओटीपी आणि इतर महत्त्वाची माहिती दुसऱ्या व्यक्तीला दिलेल्या कळू शकते. त्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसानही होऊ शकतं.
क्रिकेटर रजत पाटीदार याचा बंद मोबाईल नंबर दुसऱ्या ग्राहकाला देण्यात आला. त्यामुळे रजतला येणारे कॉल दुसऱ्या ग्राहकाला येऊ लागले.
छत्तीसगडमधील मनिष बीसी याने 28 जूनला नवा सिम कार्ड खरेदी केला. मनिषने सिम कार्ड घेतल्यानंतर सर्व प्रोसेस पूर्ण केली. त्यानंतर सिम एक्टीव्ह झाला. त्यानंतर मनिषला WhatsApp वर रजत पाटीदार याचा डीपी दिसला. मनिष क्रिकेट चाहता असल्याने त्याने डीपी पाहताच रजत पाटीदार असल्याचं ओळखलं. मात्र मनिषला याबाबत काही माहित नव्हतं. त्यामुळे मनिषने हा विषय फार गांभीर्याने घेतला नाही. मात्र काही दिवसांनी मनिषने घेतलेल्या नव्या नंबरवर चक्क विराट कोहली आणि एबी डी व्हीलियर्स यांचा कॉल आला.
विराट आणि एबी आपल्याला कशाला कॉल करतील? आपली कुणीतरी फिरकी घेतंय, असंच मनिषला वाटलं. मात्र असं असताना काही दिवसांनी मनिषच्या घरी पोलिसांनी धडक दिली. त्यानंतर जे समोर आलं त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मनिषला कंपनीकडून देण्यात आलेला नंबर हा चक्क रजत पाटीदार याचा होता. त्यानंतर पोलिसांनी मनिष आणि कुटुंबियांना विश्वासात घेत आणि परवानगीने हा नंबर बंद केला.
त्यामुळे तुमच्याकडे असलेला पर्यायी नंबर बंद असेल आणि तो दुसर्या ग्राहकाला वितरीत करण्यात आला तर मनस्ताप सहन करावा लागू शकतो. हा संभाव्य मनस्ताप होऊ नये म्हणून वेळोवेळी रिचार्ज करायला हवा.
ट्राय अर्थात टेलिकॉम रेगुलेटरी एथॉरिटी ऑफ इंडियाचे सिम कार्ड अॅक्टीव्हेशनबाबत काही नियम आहेत. त्या नियमांचे पालन करणं टेलिकॉम कंपन्यांना करणं अनिर्वाय आहे. ट्रायच्या नियमांनुसार, ग्राहक ठराविक कालावधीनंतरही रिचार्ज करत नसेल तर संबंधित कंपनी तो नंबर बंद करुन दुसऱ्या ग्राहकाला वितरित करु शकते. हा नियम सर्व टेलिकॉम कंपन्यांना लागू आहे. त्यामुळे गोपनियता भंग होऊ नये तसेच मनस्ताप टाळायचा असेल तर वेळोवेळी रिचार्ज करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
व्ही कंपनीचं सिमकार्ड 90 दिवस रिचार्जशिवाय अॅक्टीव्ह राहतं. मात्र त्यानंतर सेवा बंद करुन तोच नंबर दुसऱ्या ग्राहकाला देण्याचे अधिकार कंपनीला आहेत. व्ही नंबर सुरु ठेवण्यासाठी किमान 49 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल.
जिओ सिम कार्डही 90 दिवस रिचार्जशिवाय सुरु राहतं. त्यानंतर ठराविक कालावधीनंतर इनकमिंग कॉल बंद केले जातात. जिओ सिम 90 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस रिचार्ज न केल्यास तो नंबर दुसर्या ग्राहकाला दिला जाऊ शकतो.
जिओ आणि व्हीच्या तुलनेत एअरटेलच्या ग्राहकांना 15 दिवसांची वाढीव मुदत आहे. एअरटेल सिम कार्ड कोणत्याही रिचार्जशिवाय 90 दिवसं चालतो. त्यानंतर कंपनीकडून 15 दिवसांचा अतिरक्त वेळ दिला जातो. मात्र त्यानंतरही रिचार्ज न केल्यास कंपनी नंबर बंद करुन दुसऱ्या ग्राहकाला देऊ शकते. त्यामुळे तुमची गोपनिय माहिती इतर कुणाला समजू नये आणि मोबाईल नंबर बंद होऊ नये, असं वाटत असेल तर वेळेत रिचार्ज करणं शहानपणाचं ठरेल.