आशिया कप 2025 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना दुसऱ्यांदा रंगणार आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेला पाकिस्तानसोबत भारतीय संघ दुसऱ्यांदा भिडणार आहे. सुपर 4 फेरीतील हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. साखळी फेरीतील सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून धुव्वा उडवला होता. या सामन्यात पाकिस्तानी संघाला कुठेच डोकं वर काढू दिलं नाही. त्यामुळे पाकिस्तान दुसऱ्यांदा तयारनिशी उतरणार यात काही शंका नाही. कारण अंतिम फेरीत जागा मिळवायची असेल तर हा सामना काहीही करून जिंकावाच लागणार आहे. पाकिस्तानचा संघ दुसऱ्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये बदल करण्याची दाट शक्यता आहे. कारण भारताविरूद्धच्या सामन्यात ओपनिंग जोडी पूर्णपणे फेल गेली होती. त्यामुळे संघावर पहिल्या चेंडूपासून दडपण आलं होतं. त्यामुळे निश्चितच संघात बदल केले जातील, असं दिसत आहे.
सलामी फलंदाज सैम अयुबकडून पाकिस्तानी चाहत्यांना फार अपेक्षा होत्या. सामना सुरू होण्यापूर्वी त्यांनी खूप मोठ्या बाता मारल्या होत्या. बुमराहला षटकार मारेन वगैरे बरळला होता. पण पहिल्याच चेंडूवर बाद होत तंबूत परतला होता. इतकंच काय तर दुबळ्या युएई आणि ओमानविरुद्धच्या सामन्यातही त्याला खातं खोलता आलं नव्हतं. त्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठत आहे. त्यामुळे त्याच्यावर टांगती तलवार आहे. दुसरीकडे, युएईविरुद्धच्या सामन्यात खुशदील शाह याला संधी दिली होती. मात्र तो देखील काही खास करू शकला नाही. त्यामुळे त्याच्या हुसैन तलात किंवा फहीम अश्रफला संधी दिली जाऊ शकते.
दुसरीकडे, कर्णधार सलमाना आघाचा फॉर्मदेखील चिंतेचा विषय आहे. या स्पर्धेत मोठी खेळी करण्यात त्याला अपयश आलं आहे. दुसरीकडे, गोलंदाजीतही पाकिस्तान काही खास करू शकला नाही. स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी या स्पर्धेत आपली छाप सोडू शकला नाही. त्यामुळे भारताविरूद्धच्या सामन्यात दिग्गज खेळाडूंना तर बसवणार नाही. पण सलामीला काही बदल होऊ शकतो.
भारताविरुद्ध संभाव्य प्लेइंग 11 : सैम अयूब, साहिबजादा फरहान, मोहम्मद हारिस (विकेटकीपर), फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), हसन नवाज, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ/हसनैन तलत, शाहीन अफरीदी, हारिस रऊफ, अबरार अहमद.