वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेपूर्वीची रंगीत तालीम म्हणून भारत ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेकडे पाहिलं जात होतं. मात्र या मालिकेत भारताचा 1-2 ने पराभव झाला. शेवटच्या निर्णायक सामन्यात भारतीय गोलंदाज पुरते हतबल दिसले. त्याचा फायदा घेत ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर उभा केला. ऑस्ट्रेलियाने 47.5 षटकात सर्व गडी गमवून 412 धावा केल्या आणि विजयासाठी 413 धावांचं आव्हान दिलं. भारताने 47 षटकात सर्व गडी गमवून 369 धावा केल्या. हा सामना भारताने 43 धावांनी गमावला. या पराभवामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. भारताने अद्याप एकदाही वनडे वर्ल्डकप स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे यंदा भारतात वर्ल्डकप असल्याने आशा आहेत. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील खेळी पाहून क्रीडाप्रेमींना चिंता सतावत आहे.
ऑस्ट्रेलियाकडून बेथ मुनीने आक्रमक खेळी केली. तिने 75 चेंडूत 23 चौकार आणि 1 षटकार मारत 138 धावा केल्या. तर जॉर्जिया वोलने 81, तर एलिसा पेरीने 68 धावांची खेळी केली. त्याच्या झुंजार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने इतकी मोठी मजल मारली. तर ऑस्ट्रेलियाने गोलंदाजीतही कमाल केली. कीम ग्राथने 3, मेगन स्कटने 2, तर एशले गार्डनर, ताहिला मॅकग्राथ, ग्रेस हॅरिस आणि जॉर्जिया वारेहम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. भारताकडून क्रांती गौड, रेणुका सिंह, स्नेह राणआ, अरुंधती रेड्डी आणि दीप्ती शर्मा यांनी विकेट घेतल्या. पण या सर्वांची षटकं महागडी ठरली. राधा यादवने 4 षटकात 48 धावा दिल्या. पण एकही विकेट घेता आली नाही. त्यामुळे भारतीय गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
भारतीय संघाने हे आव्हान गाठण्यासाठी झुंजार खेळी केली. सलामीची फलंदाज स्मृती मंधानाने आक्रमक खेळी केली. तिच्या शतकी खेळीमुळे भारताचा विजय होऊ शकतो अशा आशा वाढल्या होत्या. पण तिची विकेट पडली आणि आशा मावळल्या. स्मृती मंधानाने 63 चेंडूत 17 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 125 धावांची खेळी केली. तिला कर्णधार हरमनप्रीत कौरची साथ मिळाली. तिनेही 35 चेंडूत 8 चौकार मारत 52 धावा केल्या. तर दीप्ती शर्माने मधल्या फळीत मोर्चा सांभाळत 72 धावांची खेळी केली. पण पदरी निराशाच पडली.