आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीतील पहिल्या सामन्यात श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आमनेसामने आहेत. उभयसंघातील सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. बांगलादेशच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन लिटन दास याने फिल्डिंगचा निर्णय घेत श्रीलंकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. श्रीलंकेने प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केलेले नाहीत. तर बांगलादेशने2 बदल केले आहेत. बांगलादेशने प्लेइंग ईलेव्हनमध्ये शोरिफूल इस्लाम आणि मेहदी हसन यांचा समावेश केला आहे.
श्रीलंकेचा 22 वर्षीय फिरकीपटू दुनिथ वेलागे याच्यावर 2 दिवसांपूर्वी दु:खाचा डोंगर कोसळला होता. अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यादरम्यान दुनिथच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यामुळे दुनिथला यूएईवरुन मायदेशी परतावं लागलं होतं. मात्र दुनिथ एका दिवसात पुन्हा श्रीलंका संघासह जोडला गेला आहे. दुनिथ बांगलादेश विरूद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये आहे. दुनिथने दु:खात असतानाही कुटुंबाऐवजी देशाला प्राधान्य दिलं. दुनिथने यासह तो मानसिकरित्या किती कणखर आहे, हे दाखवून दिलंय. तसेच दुनिथच्या या निर्णयाचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे.
दोन्ही संघांकडून मौन
टॉसनंतर दोन्ही संघांचे खेळाडू आणि पंच राष्ट्रगीतासाठी मैदानात आले. राष्ट्रगीताआधी दोन्ही संघांच्या खेळाडूंसह उपस्थितांनी दुनिथच्या वडिलांसाठी मौन पाळलं आणि मृत आत्म्याला श्रद्धांजली अर्पण केली.
बांगलादेश आणि श्रीलंका दोन्ही संघांची ही या स्पर्धेत आमनेसामने येण्याची दुसरी वेळ आहे. याआधी दोन्ही संघ साखळी फेरीत आमनेसामने आले होते. तेव्हा श्रीलंकेने बांगलादेशवर सहज विजय मिळवला होता. तसेच श्रीलंकेने साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता बांगलादेशला सुपर 4 मध्ये विजयी सुरुवात करायची असेल तर श्रीलंकेला रोखावं लागणार आहे.तसेच या सामन्यानिमित्ताने बांगलादेशकडे गेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. त्यामुळे बांगलादेश गेल्या पराभवाचा हिशोब करणार की श्रीलंका सलग चौथा विजय मिळवणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : सैफ हसन, तंझीद हसन तमीम, लिटन दास (कॅप्टन आणि विकेटकीपर), तॉहीद हृदॉय, शमीम हुसेन, झाकेर अली, महेदी हसन, नसुम अहमद, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम आणि मुस्तफिजुर रहमान.
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : पाथुम निसांका, कुसल मेंडीस (विकेटकीपर), कामिल मिश्रा, कुसल परेरा, चरिथ असालंका (कर्णधार), दासुन शनाका, कामिंदू मेंडिस, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलागे, दुष्मंथा चमीरा आणि नुवान तुषारा.