सणासुदीच्या तोंडावर गृहिणींना वेलचीचा तडाखा
esakal September 22, 2025 07:45 PM

सणासुदीच्या तोंडावर गृहिणींना वेलचीचा तडाखा
होलसेल बाजारात १,४०० ते २,३०० रुपये किलो भाव
वाशी, ता. २१ (बातमीदार) ः चहा, दुधासह मिठाईमध्ये सर्रास वापरली जाणारी वेलची आता सोन्याच्या भावाने विकली जात असल्याने सामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठा चटका बसत आहे. सध्या होलसेल मार्केटमध्ये वेलचीचा भाव १,४०० ते २,३०० रुपये किलो असून किरकोळ बाजारात २५ ते ६० रुपये तोळ्याला ती विकली जात आहे.
पूर्वी केरळ, तमिळनाडू आणि सिक्कीममध्ये मोठ्या प्रमाणावर वेलचीचे उत्पादन होत होते; मात्र आता झारखंड, ओडिशा, बिहार, उत्तराखंड, पंजाब, आसाम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल अशा राज्यांमध्येही वेलचीचे उत्पादन सुरू झाले आहे. वेलचीचा वापर मुख्यतः चहा, कॉफी, मिठाई, बेकरी, बिर्याणी आणि विविध मसालेदार पदार्थांमध्ये केला जातो. ताज्या आणि सुगंधी चवीमुळे विशेषतः चहात वेलचीचा जास्त वापर केला जातो. दरवर्षी दसरा-दिवाळीच्या सणासुदीत वेलचीची मागणी वाढते. फराळ, मिठाई आणि विविध पक्वान्नांमध्ये तिचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने प्रत्येक घरात ती नियमितपणे वापरली जाते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी तब्बल सात टन ४८०० किलो वेलचीची आवक झाली. साधारणतः दररोज पाच ते सात टन वेलची बाजारात दाखल होत असून या व्यापारातून रोज दीड ते दोन कोटी रुपयांची उलाढाल होते.
................
आरोग्यासाठी लाभदायक
आरोग्यदायी दृष्टीनेही वेलची लाभदायक मानली जाते. पचनक्रिया सुधारण्यासाठी, तोंडाचे आरोग्य टिकवण्यासाठी, हृदयाचे कार्य व्यवस्थित ठेवण्यासाठी, मधुमेह नियंत्रणासाठी तसेच शरीरातील दाह कमी करण्यासाठी वेलचीचा वापर उपयुक्त ठरतो. वेलचीचे हिरवी आणि काळी असे दोन प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. हिरवी वेलची प्रामुख्याने मिठाई, चहा आणि दूध यामध्ये वापरली जाते, तर काळी वेलची मसालेदार पदार्थांसाठी जास्त उपयोगी मानली जाते. एकंदरीत, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वेलचीचे वाढलेले भाव ग्राहकांच्या खिशाला चांगलाच चाट देत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.