Koyna Dam: 'कोयना'तून सोडले ६६.४३ टीएमसी पाणी; जलाशयात आवक सुरूच
esakal September 23, 2025 01:45 AM

-जालिंदर सत्रे

पाटण: कोयना धरण व पाणलोट क्षेत्रात १८ मेपासून सातत्याने पडलेल्या पावसामुळे एकूण १६४.३३ टीएमसी पाण्याची विक्रमी आवक झाली. त्यामुळे १५ जुलैपासून आजपर्यंत धरणाचे सहा वक्र दरवाजे धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी सहा वेळा उघडावे लागले, तर कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सरासरी ५२७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणातील पाणीसाठा नियंत्रण व पायथा वीजगृहाद्वारे ६६.४३ टीएमसी पाणी कोयना नदीपात्रात सोडून द्यावे लागले आहे. सध्या धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.

चिंता मिटली

पाणलोट क्षेत्रात सरासरी ५२७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, कोयनानगर येथे ४५६०, नवजाला ५७९९ आणि महाबळेश्वरला ५४५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. खरीप वाया गेला असला तरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची काळजी मिटली अाहे.

जलाशयात आवक सुरूच

वीज निर्मितीसाठी १३.०५ टीएमसी पाणी वापर झाला असून, २.४० टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. धरणात सध्या एकूण पाणीसाठा १०५.०३ टीएमसी असून, जलाशयात प्रतिसेकंद ८१०७ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणाच्या सहा वक्र दरवाजातून ९६०० व पायथा वीजगृहातून २१०० असा एकूण ११ हजार ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. जलवर्षात सहावेळा धरणाचे दरवाजे उघडावे लागले व पाचवेळा बंद करण्यात आले. यामध्ये एकूण ४१ दिवस सहा वक्र दरवाजातून विसर्ग करण्यात आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.