नाशिक: महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेमध्ये नाशिकच्या खेळाडूंचे वर्चस्व प्रकर्षाने दिसून आले. या मानाच्या स्पर्धेतील पुरुषांच्या एकेरीत व १९ वर्षांखालील मुलांच्या गटात नाशिकच्या कुशल चोपडाने दुहेरी मुकुट पटकावला. महिला एकेरीत टीएसटीटीएच्या अनन्या चांदे व १९ वर्षांखालील मुलींच्या गटात नाशिकच्या स्वरा करमरकर हिने अजिंक्यपदावर नाव कोरले.
१९ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम मानांकित स्वरा करमरकरने उपांत्य फेरीत ठाण्याच्या वैदेही ठाकरेचा अपेक्षेप्रमाणे ११-५, ११-४, ११-३ असा ३-० ने सरळ पराभव करून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत स्वरा करमरकरने पुण्याच्या नायशा नेवासकर हिचा ६-११, ११-७, १३-११, ४-११, ११-९, १५-१३ असा ४-२ने पराभव करून अजिंक्यपद पटकावले.
अनन्याचा शानदार खेळ
महिला एकेरीत प्रथम मानांकित टीएसटीएच्या अनन्या चांदेने अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत मुंबईच्या सेनहोरा डिसूझाला १२-१०, ११-५, ८-११, ५-११, ११-४, १२-१० असे ४-२ने पराभव केले. अंतिम फेरीत टीएसटीटीएच्या पहिल्या मानांकित अनन्या चांदेने नाशिकच्या सायली वाणीचा ११-२, ११-६, ८-११, १३-११, ४-११, ११-४ असा ४-२ने पराभव करीत विजेतेपद पटकावले.
कुशल चोपडाचे यश
पुरुष एकेरीत तेरावे मानांकन असणाऱ्या कुशल चोपडाने अंतिम फेरीत टीएसटीटीएच्या सागर कस्तुरेचा १२-१०, ८-११, १०-१२, ११-७, ११-१३, ११-५, ११-७ असा ४-३ने पराभव करीत विजयश्री प्राप्त केली.
IND vs PAK : औषध देण्याची गरज होती आणि...! Abhishek Sharma ने पाकिस्तान संघाचा माज उतरवला; म्हणाला, नाद कराल तर...कुशल अन् शर्वेयमध्ये रोमहर्षक लढाई
१९ वर्षांखालील मुलांच्या गटात नाशिकच्या ११व्या मानांकित कुशल चोपडा याने बिगर मानांकित टीएसटीए मुंबईच्या शर्वेय सामंत याचा ११-५, ११-६, ९-११, ११-३, ११-७ असा ४-१ पराभव करीत अंतिम फेरीत पाऊल ठेवले. या सामन्यात कुशल आणि शर्वेय यांच्यात झालेल्या फोरहँड आणि बॅकहँड फटक्यांचा आनंद प्रेक्षकांना पाहावयास मिळाला. अंतिम फेरीत कुशल चोपडाने पुण्याच्या ईशान खांडेकरचा ६-११, ११-८, ११-८, ७-११, ११-४, ११-८ असा ४-२ने पराभव करून विजेतेपद पटकावले.