पिंपरी, ता. २१ ः नवरात्रोत्सवाला उद्यापासून (ता. २२) प्रारंभ होत आहे. नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर, नऊ दिवस होणारी नऊ रंगांची उधळण, श्रीसुक्ताचे पठण त्याच बरोबर तरुणाईसाठी आयोजित केले जाणारे गरबा व दांडियाचे कार्यक्रम.
आदिशक्तीचा जागर असणाऱ्या नवरात्रोत्सवामुळे शहरातील वातावरणही चैतन्यमय झाले आले. घरोघरी मवारी घटस्थापनेसाठी लगबग सुरू आहे. शहरातील देवीच्या मंदिरांनाही रोषणाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमधील देवींच्या मंदिरामध्ये गेल्या आठवड्यापासूनच तयारी सुरू होती. यामध्ये मंदिरांची साफसफाई, रंगरंगोटी करण्याबरोबरच भक्तांच्या सोयीसाठी दर्शनबारी व मंडपही उभारण्यात आले आहेत. आकुर्डीतील तुळजाभवानी मंदिर, पिंपरीतील कालिकामाता मंदिर, खराळवाडीतील खराळाई मंदिर, दुर्गा टेकडीवरील दुर्गादेवी मंदिर, पिंपरीतील वैष्णोदेवी मंदिर, दापोडीतील फिरंगाई, पिंपळे गुरव येथील तुळजाभवानी मंदिरात सोमवारी घट बसवले जातील. रविवारी तयारी पूर्णत्वास नेण्यात आली. शहरातील इतर मंदिरांनाही रोषणाई करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी नऊ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बाजारामध्ये गर्दी
रविवारी घटस्थापनेचे पूजासाहित्य घेण्यासाठी बाजारात मोठी गर्दी झाली होती. महिलावर्गाकडून घराची साफसफाई यापूर्वीच करण्यात आली होती. ही तयारी झाल्यावर घटस्थापनेचे साहित्य घेण्यासाठी बहुतांश नागरिक रविवारी सहकुटुंब बाहेर पडले. सर्वच बाजारपेठा, मंडईसह फुल बाजारात ग्राहकांची गर्दी झाली होती. घटस्थापनेसाठी आवश्यक माती, मातीचे घट, सात प्रकारची धान्ये, परडी, देवीचे वस्त्र, विड्याची पाने, सुपारी, फुले, हार यांसह पूजेचे साहित्य खरेदी करण्यात आले.
तरुणाईची सज्जता
तरुणांसाठी नवरात्र म्हणजे दांडिया व गरबाचे कार्यक्रम. यावर्षी शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये रासदांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे दांडियासाठी आवश्यक घागरा, केडिया यांची खरेदी करण्यासाठी तरुणांनी पिंपरी मार्केटसह उपनगरांमधील दुकानांमध्ये गर्दी केली होती. त्यासोबतच चांदीचे दागिने, लहान मुलांची ड्रेपरी यांचीही खरेदी करताना महिला दिसून आल्या.
---