पारगाव मेमाणे : पारगाव मेमाणे (ता. पुरंदर) येथे डीजेचा ताल, फटाक्यांची आतषबाजी व जोडीला स्थानिक पारंपारिक वाजंत्र्यांच्या झंकारात बैलांची मिरवणूक काढण्यात आली होती. अलीकडे शेती कामासाठी बहुतांश शेतकरी यांत्रिक अवजारांचा वापर करत आहेत.
पारगावात सकाळपासून दारी बैल असलेल्या शेतकऱ्यांच्या घरात लगबग सुरू होती. बैलांना स्नान घालून त्यांना अलंकारांनी सजवणे. या कामाच्या लगबगीत शेतकरी दिसत होते. विविध रंगांचे ठसे उमटवून, नावे लिहून, नक्षीकाम करून बैलांना सजविण्यात आले होते. शिंगांना शेंब्या, घुंगरमाळा, आरशा, पितळी साखळ्या, झुलींचा बैलांना साज चढविण्यात आला होता.
ग्राम दैवतांचे दर्शन, ग्रामप्रदक्षिणेच्यावेळी फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. ढोलक, ताशा, सनई व शिंग या वाद्यांच्या तालावर ज्येष्ठांनी ठेका धरला होता. पारेश्वर, भैरवनाथ व मारुती मंदिराला प्रदक्षिणा घालून बैलांना मिरवले जात होते. यावेळी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता.