Nashik News : 'सुपरवुमन' बनण्याच्या नादात स्त्रीची ओढाताण; 'आम्ही साऱ्याजणी' उपक्रमात मान्यवरांचे विचार
esakal September 23, 2025 05:45 AM

नाशिक: स्त्रीने कितीही प्रगती केली तरी घरसंसार सांभाळताना जबाबदारी निभावण्याचा एक अदृश्य करार तिने केलेला असतो. सर्व रूढी, परंपरा पाळण्याची जबाबदारी तिच्यावर सोपविली असल्यामुळे आता विविध माध्यम आणि घटकांच्या माध्यमातून विचार बदलण्याची गरज निर्माण झाली असल्याचा सूर ‘आम्ही साऱ्याजणी’ उपक्रमाद्वारे उमटला.

‘सकाळ’च्या सातपूर कार्यालयात नवरात्रीच्या पूर्वसंध्येला रविवारी (ता.२१) ‘साहित्य आणि संस्कृती’ क्षेत्रातील मान्यवर महिलांच्या सहभागाने हा उपक्रम घेण्यात आला. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे निवासी संपादक अभय सुपेकर यांनी प्रास्ताविक केले.

लेखिकेची भूमिका बदलती असायला हवी, ती एकांगी नसावी. आपण बदलतो पण आपल्याबरोबर समाज बदललेला नसतो. तो त्याच पद्धतीने विचार करीत असतो. त्यामुळे आता विविध माध्यमांद्वारे स्त्रीने व्यक्त होणे गरजेचे आहे. एकांगी विचारातून निर्माण झालेली परिवर्तनाची चळवळ कधी लुप्त होईल हे सांगता येत नाही, त्यासाठी प्रवाहाचे दोन्ही तट भक्कम असायला हवेत.

-प्राचार्या डॉ. वेदश्री थिगळे

माणूस म्हणून आपण एका मंचावर कमी येतो, त्यामुळे राज्यस्तरीय साहित्यसखी महिला संमेलनाला सुरवात केली. त्यातून महिलांचे विचार, लेखन आणि बोलण्याचे विषय बदलत गेले. महिला सबलीकरण आवश्यकच पण सक्षम बाईशी कसे वागावे हे अजूनही अनेकांना समजत नाही. विषमतेतून दु:खाची निर्मिती होते आणि परिवर्तनासाठी डोक्याला वैचारिक खाद्य पुरविणे गरजेचे असते.

-डॉ. प्रतिभा जाधव

भारतीय संस्कृती अजून एवढी विकसित झाली नाही की, पुरूष स्वयंपाक घरात जाऊन काम करेल. ती परिस्थिती हळूहळू बदलत आहे. पूर्वी किशोरवयीन मुलांचे भरकटण्याचे प्रमाण अल्प होते, आता ते वाढतेय. सुपरवुमन बनण्याच्या नादात नऊ हात असल्यासारखे सर्व थडींवर हात ठेऊन तिची ओढाताण होते. या सर्वच विचारांच्या मुळाशी काम करणे गरजेचे आहे.

-अमृता कवीश्र्वर, शिक्षिका

तेहतीस वर्षापासून ग्रंथपाल आणि ४० वर्ष साहित्य क्षेत्रात काम करतेय. नुकतीच सृजनरंग प्रकाशन संस्था सुरू केली. लेखकाला विषय दिल्यावर लेखन कृत्रिम होऊ शकते पण आतला आवाज कागदावर उतरल्यावर ते खरे लेखन असते. केवळ वेदना, समस्या मांडण्यापेक्षा नवीन पिढीला काय देऊ शकतो याचा विचार व्हायला हवा.

-डॉ. अंजना भंडारी

रूढी, परंपराच्या जाचात दबलेली स्त्री एक पाऊल पुढे टाकते, तेव्हा आधी समाज मग कुटुंबच नाकारेल अशा विचाराने अनेक कर्तृत्ववान स्त्रिया आज घरी बसून आहेत. संपुर्ण पुस्तक वाचल्यानंतर तुमच्यात बदल झालेला असतो पण एखादी स्त्री वेगळा निर्णय घेते तेव्हा चौकट मोडण्यापेक्षा ती उभी राहते असे कुणी समजत नाही. प्रत्येक पिढीचा संघर्ष वेगवेगळा असतो.

-प्रा. डॉ. विद्या सुर्वे-बोरसे

Navratri Wishes 2025: स्टिकर नाही, AI क्रिएशन ‘खास’! नवरात्रीसाठी Gemini आणि ChatGPT ने फोटो तयार करा आणि सर्वांना द्या शुभेच्छा

पर्यटनाचा छंद असल्याने सर्वांमध्ये मिळून मिसळून राहायला आवडते, त्यातून प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने बघण्याची सवय झाली. विद्यार्थ्यांना शिकविताना कोणत्याही विषयाचे निकष ठेवले नाहीत. त्यामुळे माझा वेळ व्यर्थ गेला असे म्हणणार नाही. त्यातून माझी चौदा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कुठेही कार्यक्रमाला गेले तरी आदर मिळतो.

-अलका दराडे, ज्येष्ठ लेखिका

गेल्या १३ वर्षापासून शिक्षण क्षेत्रात काम करतेय. ‘जेन झी’ पिढीतील मुलांच्या आईंचा विचार असतो की, जे मला मिळाले नाही ते माझ्या मुलीला मिळायला हवे. माझ्यावर बंधने होती म्हणून मी काही करू शकले नाही पण स्वातंत्र्याच्या नावाखाली काय चूक, काय बरोबर हेच त्यांच्या लक्षात येत नाही. यातून नवीन पिढी घडणार कशी?

-प्राचार्या डॉ. अश्र्विनी अत्रे-दीक्षित

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.