सांगुर्डी, ता. २२ ः तळेगाव ते उरुळी कांचन या प्रस्तावित लोहमार्गामुळे सांगुर्डी गावाला मोठ्या प्रमाणात फटका बसणार असल्याने ग्रामस्थांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे. गावात नुकतीच विशेष ग्रामसभा घेण्यात आली, ज्यात या प्रकल्पाला गावाच्या हद्दीतून नेण्यास एकमुखी विरोध करण्यात आला आणि तसा ठराव मंजूर करण्यात आला.
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच वसंत भसे होते. यावेळी उपसरपंच योगिता भसे, सदस्य संदीप चव्हाण, वसंत दवणे, सोनम भसे, नयन भसे, रेखा मराठे तसेच मारुती भसे, निवृत्ती भोसले, संदीप भसे, चंद्रकांत भसे, संदीप भसे, सोमनाथ भसे, महेश भसे यांनी चर्चेत भाग घेऊन विचार व्यक्त केले.
गावात आधीच गेल इंडिया आणि हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पाइपलाइनमुळे सुमारे ३५ टक्के शेती क्षेत्र बाधित झाले आहे. आता नव्या रेल्वे प्रकल्पामुळे आणखी सुमारे ५० टक्के भूभाग घेतला जाणार आहे. त्यामुळे जवळपास ४० टक्के शेतकरी भूमिहीन होण्याची शक्यता आहे. या लोहमार्गात ७५ टक्के शेतकऱ्यांची घरे आणि गोठे येतात, त्यामुळे त्यांच्या रोजच्या जीवनावर परिणाम होणार आहे.
ग्रामस्थांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी, पालकमंत्री, खासदार आणि आमदार यांना लेखी निवेदन देऊन या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. तरीही जर शासनाने याची दखल घेतली नाही, तर पुढे आंदोलन, उपोषण आणि रास्ता रोको करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
सांगुर्डी ः ग्रामस्थांनी प्रस्तावित लोहमार्ग प्रकल्पाला एकमुखी तीव्र विरोध दर्शवला.