नवी दिल्ली : ‘अमेरिकेत शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गेल्या वर्षभरात ४६ टक्क्यांहून अधिक घट झाली असून, कॅनडासाठी हीच टक्केवारी ७५ आहे,’ अशी माहिती ‘आयडीपी एज्युकेशन’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सन १९६९ मध्ये ऑस्ट्रेलिया सरकारने स्थापन केलेली ‘आयडीपी’ एज्युकेशन ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणाच्या क्षेत्रातील संस्था असून, विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षण घेण्यासाठी ती मदत करते. ‘आयडीपी’ संस्था अभ्यासक्रम व विद्यापीठाची निवड, अर्ज सादर करणे, व्हिसा प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करते. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटन आणि अमेरिका यांसह विविध देशांमधील शिक्षणसंस्था, विद्यापीठे येथील शिक्षणाबाबत मार्गदर्शन प्रदान करते. ही संस्था इंग्रजी भाषा प्राविण्य चाचणी ‘आयईएलटीएस’ आयोजित करते.
दक्षिण आशिया, कॅनडा आणि लॅटिन अमेरिकेसाठीचे प्रादेशिक संचालक पीयुषकुमार यांच्या माहितीनुसार, ‘‘भूराजकीय परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या अमेरिका आणि कॅनडाला जाण्याच्या नियोजनावर परिणाम झाला आहे. मला वाटते की, प्रामुख्याने अमेरिकेतील सद्यस्थिती त्यासाठी कारणीभूत आहे. गेल्या ६ ते १२ महिन्यांत अमेरिकेत जाण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नियोजनावर परिणाम झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदावर येण्यापूर्वीच त्यांची सुरुवात झाली होती. व्हिसा मंजुरी आणि त्यासाठीचे नियम कठोर होत गेले.’’
‘‘सामान्यतः आपण पाहतो की व्हिसाचे शुल्क काही कारणांनी कमी होतात. मात्र, अमेरिकेत आता तसे होताना दिसत नाही. मे २०२४ च्या तुलनेत यावर्षी मे महिन्यात अमेरिकेतील शिक्षणविषयक चौकशीत ४६.४ टक्के घट झाली आहे. गेल्या दोन वर्षांत कॅनडाच्या चौकशीतही सुमारे ७० ते ७५ टक्क्यांनी घट झाली आहे. कॅनडामध्ये गेल्या दोन वर्षांत बरेच बदल झाले आहेत.
याची सुरुवात झाली कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि भारत सरकार यांच्यातील वादापासून झाली; परंतु कालांतराने जे घडले ते असे आहे की कॅनडालादेखील अमेरिकेच्या शुल्काचा फटका बसला आहे आणि कॅनडाच्या ८० टक्के निर्यातीला अमेरिकेचा फटका बसला आहे. कॅनडामध्ये जाण्यासाठी ही योग्य वेळ नाही,’’ असेही काही विद्यार्थ्यांना वाटते. सध्या आम्ही आमचे तंत्रज्ञान बळकट करण्यावर काम करत आहोत. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना उत्तम सेवा देण्यासाठीही आम्ही कार्यरत आहोत, असेही कुमार म्हणाले.
ब्रिटन, ऑस्ट्रेलियाकडे ओढा कायम
‘आयडीपी एज्युकेशन’चे पीयुषकुमार
यांच्या माहितीनुसार, ब्रिटन आणि
ऑस्ट्रेलियात शिक्षणाची मागणी कायम
असून, तेथे विद्यार्थी नियमित जात
आहेत. त्यांच्यामध्ये कोणतीही घट झालेली
नाही. ऑस्ट्रेलियाने औपचारिकपणे त्यात
वाढ होणार असल्याचे सांगितले असून,
तेथे ९ टक्के जागा वाढणार आहेत.
१,००,०००
‘आयडीपी’द्वारे जगभर शिकणारे विद्यार्थी
८००
‘आयडीपी’शी संलग्न जगभरातील विद्यापीठे
६३
भारतातील शहरांमध्ये ‘आयडीपी’ कार्यरत