पंचवटी: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र रस्ते यापुढे व्हाइट टॉपिंग पध्दतीचे करण्यात येणार आहे. येत्या आठ दिवसात खड्डे बुजविले जाणार आहेत. नागरिकांना खड्डेमुक्त रस्त्यावरून प्रवास करता येईल, असे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. दरम्यान, रस्त्यांची पाहणी करत असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र ज्या भागात अधिक खड्डे आहेत, त्या भागात मंत्री महाजन यांना नेणे टाळले.
महामार्गाबरोबरच शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यांची अक्षरश चाळण झाली असून छोटे- मोठे अपघातही घडत आहेत. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या समस्येने हैराण झालेल्या मखमलाबादच्या नागरिकांनी गुरुवारी (ता. १८) रास्ता रोको आंदोलन केले होते. बांधकाम विभागाचे उपअभियंता नितीन राजपूत यांनी आंदोलनस्थळी येऊन खड्डे बुजविण्यात येतील असे सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर मखमलाबाद रोडचे खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले.
रविवारी (ता. २१) मंत्री महाजन यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या रस्त्यातील खड्ड्यांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. डांबरी रस्त्यावर पाणी साचत असल्याने जास्त खड्डे पडतात. यापुढे मात्र, व्हाइट टॅपिंग पध्दतीचे सिमेंटचे रस्ते करण्यात येणार आहे. हे रस्ते वीस ते पंचवीस वर्ष टिकतात. तसेच ड्रेनेजलाइन वेगळी करण्यात येणार असून फुटपाथही राहणार आहे.
कुंभमेळ्याच्या दृष्टीने रस्त्यांचा विकास होणार आहे. शहरातील रस्त्यांवरून अवजड वाहनेही जात असल्याने, त्या दृष्टीने विचार केला जाणार असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले. आमदार ॲड. राहुल ढिकले, मनपा आयुक्त मनीषा खत्री, शहर अभियंता संजय अग्रवाल, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, स्वप्नील नन्नावरे, किरण सोनवणे, शंकर हिरे आदी उपस्थित होते.
ठाणे मेट्रोचं काम रखडलं अन् खर्चही वाढला, शिंदेंसोबत आज संपूर्ण उद्घाटनाचा मुहूर्त हुकला; फडणवीसांनी कोणावर फोडलं खापर?नागरिकांमध्ये नाराजी
वास्तविक पंचवटी विभागामध्ये हॉटेल मिरची ते तारवालानगर व पुढे मखमलाबादपर्यंतच्या रिंगरोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. गुंजाळबाबानगर व बिडी कामगारनगर परिसरामध्ये तळे साचतील एवढे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. कॉलनी रस्त्यांचीदेखील अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे ज्या भागातील रस्ते दाखवायचे ते न दाखविल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.