हल्ली रेफ्रिजरेटर ही घराघरात आवश्यक बाब बनली आहे. फ्रीज दीर्घकाळ टिकावा यासाठी अनेक लोक त्याची खूप काळजी घेतात. मात्र अनेकदा नकळत झालेल्या छोट्या चुकांमुळे रेफ्रिजरेटरचे मोठे नुकसान होऊ शकते.
आपल्यापैकी अनेकांना रेफ्रिजरेटरवर शो-पीस, प्लास्टिकचे चमचे सेट, खेळणी किंवा इतर वस्तू ठेवण्याचा शौक असतो. पण या गोष्टी ठेवणं खरोखरच योग्य असते की नाही, याबद्दल आपण तज्ज्ञांचे मत जाणून घेऊया.
अनेक घरांमध्ये फ्रिजला प्लास्टिक किंवा कापडी कव्हर लावलेले असते. हे कव्हर फ्रिजची उष्णता बाहेर जाण्यापासून रोखते. जर तुमच्याही फ्रीजवर प्लास्टिक कव्हर किंवा कापड असेल तर ते ताबडतोब काढून टाकावे.
फ्रीज सुंदर दिसावा यासाठी लोक त्याच्या वर सजावटीच्या वस्तू, ग्लास किंवा चमचे ठेवण्यासाठी प्लास्टिकचे स्टँड किंवा प्लास्टिकची खेळणी ठेवतात. यामुळे देखील उष्णता बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो.
काही जण काचेचे ग्लास, फिश टँक किंवा इतर अनेक गोष्टी फ्रीजवर ठेवतात. मात्र रेफ्रिजरेटर जेव्हा उष्णता बाहेर फेकतो तेव्हा ही भांडी उष्णता बाहेर काढण्यात अडथळा बनतात. त्यामुळे ही सवय रेफ्रिजरेटरसाठी धोकादायक ठरते.
जागेअभावी अनेक लोक मायक्रोवेव्ह ओव्हन फ्रिजच्या वर ठेवतात. मायक्रोवेव्ह आणि ओव्हन हे स्वतः खूप उष्णता सोडतात. रेफ्रिजरेटरच्या वर ठेवल्यास, रेफ्रिजरेटरची स्वतःची उष्णता बाहेर पडत नाही. पण त्याउलट मायक्रोवेव्हमधील उष्णता रेफ्रिजरेटरला अधिक गरम करते. यामुळे रेफ्रिजरेटरच्या कंप्रेसरला लवकर नुकसान होऊ शकते. तसेच गॅस गळतीसारख्या समस्या उद्भवू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, कोणताही रेफ्रिजरेटर हा वरच्या बाजूने उष्णता बाहेर फेकतो. जर आपण त्याच्यावर कोणतीही वस्तू ठेवली, तर ती उष्णता योग्यरित्या बाहेर पडू शकत नाही. यामुळे रेफ्रिजरेटरच्या आत थंड होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो.
यामुळे कंप्रेसरवर अधिक दबाव येतो आणि यानंतर कालांतराने गॅस गळतीसारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे रेफ्रिजरेटरचे आयुष्य कमी होते. तो लवकर खराब होण्याची शक्यता असते. म्हणूनच, तज्ज्ञ नेहमीच रेफ्रिजरेटरच्या वर काहीही ठेवू नये असा सल्ला देतात.