Nobel Prize In Economics 2025: अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा हे पारितोषिक जोएल मोकियर, फिलिप अघिऑन आणि पीटर हाविट या तिघांना देण्यात आले आहे. या तिघांनी मिळून मांडलेला "इन्व्हेशन-ड्रिव्हन इकॉनॉमिक ग्रोथ" म्हणजेच नवीन कल्पनावर आधारित आर्थिक विकासाचा सिद्धांत आधुनिक अर्थव्यवस्थेत मोठं योगदान देणारा ठरला आहे.
या संशोधनामुळे अर्थशास्त्रज्ञांना हे समजले की, तंत्रज्ञानातील प्रगती, संशोधन आणि नवीन कल्पना या गोष्टी केवळ उद्योगांच्या वाढीसच नाही तर देशाच्या एकूण आर्थिक विकासालाही चालना देतात. मोकियर, अघिऑन आणि हाविट यांनी दाखवून दिलं की देशांच्या आर्थिक प्रगतीत नवीन कल्पना हा एक महत्त्वाचा घटक असतो आणि ही वाढ केवळ भांडवल किंवा मजुरीवर अवलंबून नसते.
नोबेल समितीने या संशोधनाला “आधुनिक आर्थिकधोरणांचा पाया” असे वर्णन केले आहे. कारण या सिद्धांतामुळे सरकार आणि धोरणकर्त्यांना मदत होणार आहे.
इतिहासकार आणि अर्थशास्त्रज्ञ जोएल मोकियर यांनी त्यांच्या संशोधनात इतिहासातील पुराव्यांचा आधार घेत दाखवून दिलं की समाज दीर्घकाळाच्या स्थिरतेतून बाहेर पडून सातत्यपूर्ण आणि आत्मनिर्भर विकासाकडे कसा वळतो. मोकियर यांच्या मते, तंत्रज्ञानाची प्रगती तेव्हाच शक्य होते जेव्हा समाजात ज्ञानाला सन्मान मिळतो, प्रयोगांना प्रोत्साहन दिलं जातं आणि बदल स्वीकारण्याची मानसिकता असते.
त्यांनी स्पष्ट केलं की “इन्व्हेशन” म्हणजे केवळ गोष्टी कशा काम करतात हे जाणून घेणं नव्हे, तर त्या का काम करतात हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजेच, वैज्ञानिक विचारसरणी आणि जिज्ञासा या पायाभूत गोष्टी आहेत.
मोकियर यांच्या मतानुसार, औद्योगिक क्रांती यशस्वी होण्यामागचं गुपित म्हणजे त्या काळात युरोपीय समाज नवीन कल्पनांबद्दल अधिक जिज्ञासू आणि सहिष्णु झाला होता. हीच मानसिकता त्या समाजाला पुढील संशोधन आणि नवकल्पनांसाठी सक्षम बनवणारी ठरली.
Premium|Gold Loan: गोल्ड लोनचं काळ सत्य: लोकांचे दागिने हळूहळू कसे गायब होत आहेत?त्यांच्या अभ्यासातून हेही समोर आलं की आर्थिक विकास केवळ भांडवल आणि मजुरीच्या प्रमाणावर ठरत नाही; तो समाजाच्या बौद्धिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक पायावर उभा असतो. नवोन्मेषाची खरी ताकद ज्ञानात आणि विचारमुक्ततेत दडलेली असते.
दरवर्षी दिले जाणारे हे पारितोषिक स्वीडिश संशोधक अल्फ्रेड नोबेलयांच्या स्मरणार्थ दिले जाते. त्यांच्या नावानेच दिल्या जाणाऱ्या नोबेल पारितोषिकांमध्ये अर्थशास्त्र, विज्ञान, साहित्य, शांतता आणि वैद्यकशास्त्र या क्षेत्रांचा समावेश आहे.
थोडक्यात सांगायचं तर, मोकियर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवून दिलं की, आर्थिक प्रगती म्हणजे फक्त आकडे नाहीत; ती समाजाच्या विचारशक्तीची, जिज्ञासेची आणि ज्ञानावर विश्वास ठेवणाऱ्या संस्कृतीची गोष्ट आहे.