पाच तालुक्यातील ६७६ शेतकऱ्यांना मोफत रोपे
नवभारत व अश्विनी अॅग्रोचा उपक्रम; ९६ शेतकऱ्यांना खतांचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १३ः दापोली कुणबी सेवा संघ अंतर्गत नवभारत छात्रालय परिवार आणि अश्विनी अॅग्रो फार्म यांच्यावतीने पाच तालुक्यांतील ९ गावांतील ६७६ शेतकऱ्यांना ३ हजार ६४६ मोफत रोपांचे वाटप करण्यात आले. ही रोपे १ लाख ८९ हजार २०० रूपयांची असून गेली अकरा वर्षे सातत्याने हा उपक्रम राबविला जात आहे.
दापोली, खेड, मंडणगड, गुहागर आणि लांजा तालुक्यांतील गावांतील शेतकऱ्यांना कोकम, काळीमिरी, चिकू, लिंबू, फणस, काळा पेरू आणि सोनचाफा या फळझाडांची कलमे देण्यात आली. यामध्ये १ हजार १५२ कोकम, १ हजार १२ काळीमिरी, ५७६ चिकू, ५५६ लिंबू, १५० फणस, १०० काळा पेरू आणि १५० सोनचाफा रोपे पुरविण्यात आली. यावर्षी लायन्स क्लब, दापोली यांचाही या सामाजिक उपक्रमात सहभाग होता. त्यांनी चिखलगावातील ९६ शेतकऱ्यांना खतं आणि वाळवी पावडर वाटप केली. यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला १ किलो सिंगल सुपर फॉस्फेट, २ किलो गोदरेज विकास आणि १०० ग्रॅम वाळवी पावडर पुरविण्यात आली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. प्रमोद सावंत, हरिश्चंद्र कोकमकर, प्रदीप इप्ते आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. शेतकऱ्यांनी या कलमे-रोपांची योग्य लागवड करून संस्थेचे ऋण फेडण्याचे आश्वासन दिले.
चौकट
लागवडीची प्रात्यक्षिकही दाखविली
यापूर्वी कलमे किंवा रोपे वाटलेल्या काही गावांना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन वाटप केलेल्या रोपांचे जगण्याचे प्रमाण तपासले. ते चांगले असल्याचे दिसून आले. परंतु वाटप केलेल्या कलमा रोपांच्या लागवडीचे प्रात्यक्षिक दाखविणे गरजेचे असल्याचे त्यावेळी जाणवले. त्यानुसार यावर्षी वाटप कार्यक्रमाच्या वेळी लागवडीचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.