98329
‘बांदा फ्रेंड्स फॉरेव्हर’तर्फे मदत
बांदा ः येथील खेमराज प्रशालेच्या १९८५ दहावी वर्गाच्या ‘फ्रेंड्स फॉरेव्हर’ ग्रुपने आपल्या मैत्रिणीला मदतीचा हात देऊन आदर्श उपक्रम राबविला. या ग्रुपमधील सुरेखा वाळके हिला स्वयंरोजगारासाठी या बॅचतर्फे घरघंटी प्रदान केली. दरवर्षी या बॅचतर्फे स्नेहमेळाव्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यातून मित्र-मैत्रिणींचा संपर्क वाढतो तसेच वैचारिक आदानप्रदान होते. या बॅचच्या सदस्या सुरेखा येडवे-वाळके यांचे पती सुदन वाळके यांचे नुकतेच निधन झाले. या कुटुंबाला स्वयंरोजगारासाठी सहाय्य करण्याचा निर्णय फ्रेंड्स फोरेव्हर ग्रुपतर्फे घेण्यात आला. त्यानुसार रविवारी (ता. १२) वाळके यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना घरघंटी तसेच या व्यवसायासाठी सुरुवातीला लागणारी रक्कम सुरेखा वाळके आणि तिची मुलगी दिशा वाळके यांच्याकडे प्रदान केली. यावेळी फिरोज खान, दया आळवे, भानुदास दळवी, शीतल राऊळ, साधना पांगम, संगीता सावंत, शुभा घाटे, अजय महाजन, सुधीर शिरसाट, सागर हरमलकर आदी उपस्थित होते.