नृत्यातून मानसिक आरोग्याबाबत जागरूकता
esakal October 15, 2025 06:45 PM

नृत्यातून मानसिक आरोग्याबाबत जागरूकता
जागतिक मानसिक आरोग्यदिनाचे आयोजन
कल्याण, ता. १४ (वार्ताहर): जागतिक मानसिक आरोग्यदिनानिमित्ताने मनोदय न्यूरोसायकियाट्रिक हॉस्पिटलच्या वतीने के. सी. गांधी सभागृहात भव्य आणि अर्थपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमाला सुमारे ३०० नागरिकांनी उपस्थिती लावून मानसिक आरोग्याबद्दलची जागरूकता वाढवण्याच्या प्रयत्नांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. प्रियांका, तसेच मानसशास्त्रज्ञ वर्दा, गौरी आणि श्वेता यांनी सादर केलेल्या भरतनाट्यम नृत्याने झाली. या नृत्यातून मानसिक आरोग्याचा विषय ‘नवरसां’च्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला. या २० मिनिटांच्या प्रभावी सादरीकरणामुळे सभागृहात शांतता पसरून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. यानंतर वेध टीम आणि मनोधाय ट्रस्ट यांनी ‘तितिक्षा’ हे नाटक सादर केले. डॉ. अद्वैत पाध्ये यांनी लिहिलेल्या ‘तितिक्षा’ या पुस्तकावर आधारित या नाटकाने मानसिक आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण संदेश दिला. नाटकातील पात्रांचा विनोदी आणि वास्तववादी अभिनय प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवून गेला.

या वेळी डॉ. अमित धर्माधिकारी, डॉ. अद्वैत पाध्ये आणि डॉ. प्रियांका धर्माधिकारी यांनी मानसिक आरोग्याविषयी श्रोत्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने रील मेकिंग आणि पोस्टर मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्यात गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात येथील स्पर्धकांनी सहभाग घेतला. नृत्य, नाटक, कला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मानसिक आरोग्याविषयी जनजागृतीचे उत्कृष्ट दर्शन घडले. महाराष्ट्र रेडिओलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील हे या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेक्सपियर दत्ता, मिथुन राजगुरू, तन्वी आणि श्रद्धा, उमा शहा, अमेय म्हात्रे यांचे विशेष योगदान लाभले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.