सोमेश्वरनगर, ता. १४ : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या वतीने १ ऑगस्टला ‘लोअर डिव्हिजन क्लार्क’ या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. ४० ते ६० दिवसांत त्या परीक्षेचा निकाल लागणे अपेक्षित आहे. मात्र, ७० दिवस उलटूनही अद्याप निकाल न लागल्याने उमेदवारांमध्ये नाराजी आहे.
महापारेषण कंपनीने २०२४ मध्ये आपल्या अर्थ व लेखा विभागातील लोअर डिव्हिजन क्लार्क या पदासाठी २६० जागांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. १२ एप्रिल २०२५ ते २ मे २०२५ या कालावधीत अर्ज दाखल केले होते. सुरुवातीला ६ जुलै रोजी होणारी परीक्षा नियोजनाअभावी १ ऑगस्टवर ढकलली गेली होती. या भरतीसाठी वाणिज्य शाखेच्या तब्बल ३५ हजार ४०९ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २६ हजार ३६६ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. १५० गुणांची ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. आता परीक्षा होऊन ७० दिवस झाले असतानाही निकाल न लागल्याने हजारो उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. तसेच निकालाला विलंब होत असल्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम आणि संशयही निर्माण होऊ लागला आहे. एक प्रतीक्षेतील उमेदवार म्हणाला, एकदाचा काय असेल तो निकाल वेळेत लावला पाहिजे. निदान आता दिवाळीच्या आधी निकाल लागावा आणि तो पूर्णतः पारदर्शक असावा, अशी अपेक्षा आहे. तसेच निकालासोबत वेटिंग लिस्टदेखील तातडीने जाहीर करावी.
राज्य सरकारच्या निकालांनाही विलंब लागतोय, निकाल लागून पोस्टिंग मिळायलाही विलंब लागतोय. आता महापारेषणचा निकाल ४०-४५ दिवसांतच लागणे आवश्यक आहे. मात्र परीक्षेचेही वेळापत्रक पुढे ढकलत नेले आणि आता निकालाचेही ढकलत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर प्रतिकूल परिणाम होतो. निकाल लागला की अपयशी विद्यार्थ्यांना अन्य परीक्षांच्या तयारीसाठी पूर्ण क्षमतेने उतरता येते.
- गणेश सावंत, करिअर मार्गदर्शक