WTC Points Table: एक कसोटी सामना जिंकताच पाकिस्तान अव्वल स्थानी, टीम इंडियाला बसला फटका
GH News October 15, 2025 07:14 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन दक्षिण अफ्रिकेला नव्या पर्वा पहिल्याच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. पाकिस्तानने दक्षिण अफ्रिकेला 93 धावांनी पराभूत केलं आहे. तसेच दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्याच विजयानंतर पाकिस्तानला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन मोठा फायदा झाला आहे. कारण गुणतालिकेत थेट पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. तर भारताला मोठा फटका बसला आहे. वेस्ट इंडिजला 2-0 ने पराभूत करत भारताने गुणतालिकेत आपली स्थिती मजबूत केली होती. मात्र आता पाकिस्तानच्या विजयामुळे भारताला गुणतालिकेत फटका बसला आहे. भारताची तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. तर पाकिस्तानचा संघ संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने तीन पैकी तीन सामने जिंकत पहिलं स्थान पटकावलं आहे. पण पाकिस्तानने फक्त एकच सामना जिंकत ऑस्ट्रेलियाशी बरोबरी साधली आहे. कारण दोघांची विजयी टक्केवारी ही 100 टक्के आहे. दुसरीकडे, भारताने सात पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. एक सामना बरोबरीत सोडवला आहे. त्यामुळे भारताची विजयी टक्केवारी ही 61.90 इतकी असून चौथ्या स्थानी आहे. श्रीलंकेने बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका 1-0 ने जिंकली होती. त्यात एक सामना ड्रॉ झाल्याने विजयी टक्केवारी ही 66.67 टक्के आहे. त्यामुळे श्रीलंका तिसऱ्या स्थानावर आहे.

पाकिस्तानने दक्षिण अफ्रिकेला लोळवलं

लाहोर कसोटी सामन्यात पाकिस्तानने दक्षिण अफ्रिकेला 93 धावांनी मात दिली. फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 378 धावा केल्या. तर दक्षिण अफ्रिकेचा डाव 269 धावांवर आटोपला. पहिल्या डावात आघाडी होती त्यात पाकिस्तानने आणखी 167 धावा केल्या. तसेच दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 277 धावांचं आव्हान दिलं. पण दक्षिण अफ्रिकेचा संघ 183 धावांवर आटोपला. या सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरला तो पाकिस्तानचा फिरकीपटू नोमान अली… त्याने या सामन्यात एकूम 10 विकेट घेतल्या. शाहीन आफ्रिदीने दुसऱ्या डावात 4 गडी बाद केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.