टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. त्यामुळे या दोन देशात ही स्पर्धा होणार आहे. पाकिस्तानचे सर्व सामने हे श्रीलंकेत होणार यात काही शंका नाही. पण या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार का? कारण हे दोन संघ फक्त आयसीसी आणि आशिया कप स्पर्धेत एकमेकांशी खेळतात. या दोन संघात द्विपक्षीय मालिका होतच नाही. पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याने भारताने 2012पासून पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळण्यास नकार दिला आहे. त्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आणखी कठोर धोरण अवलंबलं आहे. आशिया कप स्पर्धेत तर हस्तांदोलनही केलं नाही. पण सामना खेळत तीन वेळा पराभवाची धूळ चारली. अशा स्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सामना होणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. 2024 वर्ल्डकप स्पर्धेच्या वेळापत्रकातून याबाबत समजून घेऊयात.
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान असेल असं सांगण्यात येत आहे. मागच्या पर्वात 20 संघांचं वर्गीकरण चार गटात करण्यात आलं होतं. अ, ब, क, ड असे गट असतील आणि प्रत्येक गटात पाच संघ खेळतील. यंदाही तसंच असेल यात काही शंका नाही. भारत आणि पाकिस्तान मागच्या पर्वात एकाच गटात होते. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान सामन्याची पर्वणी क्रीडाप्रेमींना अनुभवता आली होती. पण यावेळी हे दोन संघ एकाच गटात असतील की नाही याबाबत शंका आहे. जर हे दोन संघ साखळी फेरीत एकाच गटात नसतील तर या फेरीत सामना होणार नाही. मग सुपर 8 फेरीत सामना होण्याची शक्यता आहे. कसं काय ते पुढे समजून घ्या.
साखळी फेरीतील प्रत्येक गटातील टॉप 2 संघ सुपर 8 फेरीत जागा मिळवतील. जर भारत आणि पाकिस्तानने सुपर 8 फेरीत जागा मिळवली तर या ठिकाणी सामना होण्याची शक्यता आहे. पण येथेही एक अडसर आहे. अ आणि ब गटातील टॉपचे दोन संघ ग्रुप 1 मध्ये, क आणि ड गटातील दुसर्या क्रमांकाचे संघ ग्रुप 1 खेळतील. तर अ आणि ब गटातील दुसऱ्या क्रमांकाचे संघ ग्रुप 2 आणि क आणि ड गटातील टॉप संघ ग्रुप 2 मध्ये खेळतील. त्यामुळे या समीकरणात दोन्ही संघ बसले तर सुपर 8 फेरीत आमनासामना होऊ शकतो. पण येथेही तसं झालं नाही तर उपांत्य फेरीत सामना होऊ शकतो. तसंही झालं नाही तर अंतिम फेरीत भिडू शकतात. पण यातलं एकही समीकरण बिघडलं तर हे दोन संघ भिडणार नाही. भारत पाकिस्तान आमनेसामने आले तर हा सामना श्रीलंकेत होईल.