Karnataka CM News : ‘बिहार निवडणुकीनंतर सर्व प्रलंबित मुद्द्यांवर स्पष्ट चित्र निर्माण होईल. धीर धरा, पक्षनिष्ठेचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल’, असे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना दिले आहे. शुक्रवारी (ता. १७) रात्री बंगळुरातील सदाशिवनगर येथील खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली.
पक्षातील घडामोडी, सत्तावाटप आणि बिहार विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसची तयारी या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. बिहार निवडणुकीसाठी कर्नाटकातील कोणत्या नेत्यांना जबाबदाऱ्या द्यायच्या, कोणत्या नेत्यांना प्रचार मोहिमेत सहभागी करून घ्यायचे यावरही चर्चा झाली.
खर्गे यांनी शिवकुमार यांना सांगितले, हायकमांड सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. बिहार निवडणुकीनंतर सर्वांनी एकत्र बसून संवादाद्वारे सर्व समस्या स्पष्ट कराव्यात. काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत बिहार निवडणुकीसाठी कर्नाटकातील कोणत्या नेत्यांना जबाबदाऱ्या द्यायच्या, कोणत्या नेत्यांना प्रचार मोहिमेत सहभागी करून घ्यायचे यावरही चर्चा झाली.
दरम्यान, मंत्री प्रियांक खर्गेयांच्या राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाच्या (आरएसएस) कारवायांवरील निर्बंधाच्या पत्राला पाठिंबा देत राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानंतर दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही चर्चा विशेष महत्त्वाची ठरली आहे. राज्यात सत्तावाटप आणि ‘नोव्हेंबर क्रांती’ या चर्चांच्या पार्श्वभूमीवर झालेली ही बैठक राजकीयदृष्ट्या लक्षवेधी ठरली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढील पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून होत असतानाच शिवकुमार आणि खर्गे यांची भेट विविध अर्थांनी चर्चेत आली आहे.
Karnataka Politics : कर्नाटकात वर्षअखेरीस मुख्यमंत्री बदलणार? राजकीय चर्चा सुरु असतानाच गृहमंत्र्यांच्या वक्तव्यानं वेधलं लक्षशिवकुमार यांची सोशल मीडिया पोस्ट
या भेटीनंतर शिवकुमार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून सांगितले की, त्यांनी खर्गे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मात्र, बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबद्दल त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.
दोघांची दीर्घ चर्चा
आजारी असूनही घरी विश्रांती घेत असलेल्या खर्गे यांनी शिवकुमार यांना वेळ दिला. शिवकुमार यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर दोघांनी एकांतात दीर्घ चर्चा केल्याचे सांगितले जाते आहे.