Thane News: ठाण्यात विकासकामांचा धडाका! महापालिकेकडून प्रस्तावांना मान्यता
esakal October 20, 2025 03:45 PM

ठाणे : कोरोना या महामारीपासून ठाणे पालिकेची आर्थिक स्थिती डोलायमान झालेली आहे. तरीदेखील ५७५ कोटींच्या ७२ विविध प्रकल्पांना नुकतेच प्रशासकीय महासभेत मान्यता दिली आहे. यात रस्ते, पाणी, नाले, ड्रेनेज, वीज, अग्निशमन केंद्र उभारणे यांसारखी काम करणे क्रमप्राप्त असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

ठाणे पालिकेवर असलेले दायित्व कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. यानुसार अनेक खर्चिक व नवीन प्रकल्पांना कात्री लावत, सुरु असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर पालिकेने भर दिला. तरी, वाढत्या लोकसंख्येस आवश्यक सोयी-सुविधेसाठी विविध विभागांमार्फत विकासकामांचे प्रस्ताव तयार केले आहेत. यात काँक्रीटीकरण, ड्रेनेज व्यवस्था, पाणीपुरवठा, तलाव पुनरुज्जीवन, सार्वजनिक बांधकाम, रुग्णालय आणि शौचालय बांधणी यांसारख्या कामांचा समावेश आहे.

एसीची क्षमता फक्त टनांमध्ये का मोजली जाते? १ टन एसी किती वीज वापरतो ते जाणून घ्या?

यासाठी केंद्र सरकारच्या विशेष सहाय्य योजनेंतर्गत बिनव्याजी कजार्साठी प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मात्र, निधी मंजूर होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. असे असताना, पालिकेने स्वत:च्या निधीतून तात्पुरत्या स्वरूपात कामे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पालिकेच्या अर्थसंकल्पात यासाठी पुरेशी तरतूद नसल्यामुळे आर्थिक दायित्व स्वीकारण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. खड्डेमुक्त रस्ते आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

'हे’ आहेत मुख्य प्रकल्प
  • पाणीपुरवठा सुधारणा : टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर बेड्स, उत्तर-मध्य विभागातील पाईपलाइन विस्तार, व २००० मिमी व्यासाच्या नवीन पाईपलाइन टाकण्याची कामे, खर्च एकूण अंदाजे ७५ कोटी रुपये.

  • नाले व ड्रेनेज कामे : रायलादेवी तलाव, सम्राट नगर नाला, शिवसेना स्मारकाजवळील पार्किंग नाला प्रकल्प यांसह सांडपाणी वाहिनी आणि हाउस कनेक्शन - ५० कोटी रुपये.

  • रस्ते व पूल विकास : एलबीएस रोड, तीन हात नाका, घोडबंदर सर्व्हिस रोड, माजिवडा-मानपाडा, मुंब्रा, दिवा आदी ठिकाणचे रस्ते काँक्रीटीकरण, रुंदीकरण व नूतनीकरण - ४०० कोटी रुपयांहून अधिक निधी.

  • सार्वजनिक इमारती व सुविधा : प्रभाग कार्यालये, विद्यार्थी वसतिगृह, कर्करोग बंकर युनिट, प्रशिक्षण केंद्र, शाळा, मिनी मॉल व बहुउद्देशीय इमारतींची बांधणी - ५० कोटी रुपये. आदींसह इतर महत्वाच्या कामांचा समावेश आहे.

Mumbai Metro: मेट्रो प्रवासासाठी मिळणार फुल रेंज, नेटवर्कचा प्रॉब्लेम सुटला! प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.