श्रीलंकेने आयसीसी वनडे वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत सोमवारी 20 ऑक्टोबरला रंगतदार झालेल्या सामन्यात बांगलादेशला 7 धावांनी पराभूत केलं. श्रीलंकेने बांगलादेशला शेवटच्या 7 बॉलमध्ये 5 झटके दिले आणि गमावलेला सामना अखेरच्या क्षणी जिंकला. तर बांगलादेशचं या पराभवासह स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. श्रीलंकेने बांगलादेशला विजयासाठी 203 धावांचं आव्हान दिलं होतं. बांगलादेशने 18 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 194 धावा केल्या होत्या. तर विजयासाठी शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 12 धावांची गरज होती. मात्र श्रीलंकेने शेवटच्या 12 बॉलमध्ये 4 रन्स दिल्या आणि सामना जिंकला.
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये बदल झाला आहे. श्रीलंकेने विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. तर टीम इंडियाला धोका कायम आहे. आता टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सेमी फायनलसाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.
आतापर्यंत वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत उपांत्य फेरीसाठी 4 पैकी 3 संघ निश्चित झाले आहेत. गतविजेता ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या 3 संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, ऑस्ट्रेलिया 9 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. ऑस्ट्रेलियाने 5 पैकी 4 सामने जिंकलेत. तर 1 सामना पावसामुळे वाया गेला. ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेट हा +1.818 असा आहे.
इंग्लंड पॉइंट्स टेबलमध्ये दुसर्या स्थानी आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाची कामगिरी सारखीच आहे. मात्र इंग्लंडचा नेट रनरेट हा ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत थोडा कमी आहे. इंग्लंडचा नेट रनरेट हा +1.490 इतका आहे. तिसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिका आहे. दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट हा -0.440 असा आहे. दक्षिण आफ्रिकेची या स्पर्धेत पराभवाने सुरुवात झाली. मात्र दक्षिण आफ्रिकेने त्यानंतर सलग 4 सामने जिंकले.
श्रीलंकेची विजयानंतर सहाव्या स्थानी झेप
टीम इंडिया पॉइंट्स टेबलमध्ये 4 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. टीम इंडिया या स्पर्धेतील आपला सहावा सामना हा न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. हा सामना गुरुवारी 23 ऑक्टोबरला होणार आहे. उपांत्य फेरीच्या हिशोबाने दोन्ही संघांसाठी हा सामना निर्णायक ठरणार आहे. हा सामना जिंकणाऱ्या संघाची उपांत्य फेरीत पोहचण्याची शक्यता आणखी वाढेल. मात्र पराभूत संघाच उपांत्य फेरीचं स्वप्न भंग होईल. त्यामुळे 23 ऑक्टोबरचा सामना दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेचा असा असणार आहे. त्यामुळे सलग 2 सामने जिंकून जबरदस्त सुरुवात केल्यानंतर लागोपाठ 3 मॅचेस गमावणारी टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध कशी कामगिरी करते? याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे.